नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर, सिडको येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणप्रवासाचा सन्मान केला जातो. `सेलिब्रेटिंग मीʼ या संकल्पनेवर आधारित ज्युनिअर केजीचा समारोप दिन विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि सर्वांगीण विकासाचे सुंदर दर्शन घडवणारा ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात निरोगी सवयींवर आधारित आकर्षक नाटिकेने झाली. दात घासणे, नियमित अंघोळ करणे, स्वच्छ कपडे परिधान करणे आणि पौष्टिक आहार घेणे या चांगल्या सवयी विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केल्या.
यानंतर विद्यार्थ्यांनी पूर्वलेखन कौशल्ये आणि प्रत्यक्ष वस्तू मोजून अंकज्ञानाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. फॉनिक्स सादरीकरणातून अक्षरे आणि त्यांच्याशी संबंधित गाणी जिवंत झाली, तर निरोगी फळांवरील आनंददायी गीताने कार्यक्रमात आणखी रंग भरला.
कार्यक्रमातील सर्वात आकर्षक क्षण म्हणजे `हेल्दी हेडबँडʼ उपक्रम. विद्यार्थ्यांनी फळे व भाज्यांनी सजवलेले हेडबँड परिधान करून अभिमानाने `मी निरोगी अन्न खातो//खाते !ʼ असा संदेश दिला.
समारोप दिन हा केवळ विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम नसून, त्यांना स्वतःला व्यक्त करण्याची, आत्मविश्वास वाढविण्याची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देणारा अविस्मरणीय अनुभव ठरला.
—