शालेय/जुनियर कॉलेज विज्ञान व गणित शिक्षकांकरिता एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

0
नाशिक  : प्रतिनिधी
नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघातर्फे यावर्षी सायन्स फोरम आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची एल. जी. मोबाईल सायन्स लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने, शालेय विज्ञान व गणित शिक्षकांमार्फत, इयत्ता तिसरी ते बारावी विद्यार्थ्यांकरिता पाठ्यकृती पाठशाळा या उपक्रमाद्वारे ‘विज्ञानगंगा घरोघरी’ पोहोचविण्याचा मानस आहे. या उपक्रमाचा उद्देश : विद्यार्थ्यांनी, शिक्षकांच्या मदतीने पाठ्यपुस्तकातील जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटी (पाठ्यकृती) स्वतः करून त्याचा व्हिडिओ बनविणे असा आहे. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या व्हिडिओची राज्यस्तरीय स्पर्धा घेणार असून या उपक्रमा संदर्भात चर्चा/माहितीसाठी शालेय तसेच जुनियर कॉलेजमधील विज्ञान व गणित शिक्षकांकरिता कार्यशाळा 22 ऑक्टोबर 2026 ला आयोजित करण्यात आली होती.               
कार्यशाळा पूर्णतः निःशुल्क घेण्यात आली. कार्यशाळेत डॉ. जयंत जोशी (अभियंता, बीएआरसी, मुंबई) यांनी सहज उपलब्ध असणारे साहित्य वापरून, पाठ्यपुस्तकावर आधारित साधारण 60 ते 70 प्रयोगांचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे उद्घाटन व मार्गदर्शन प्रमुख अतिथी सरोज जगताप, सचिव एस. एस. सी. बोर्ड विभागीय मंडळ नाशिक शिक्षणाधिकारी (योजना माध्यमिक), जिल्हा परिषद, नाशिक यांचे हस्ते झाले. कृतीसह विज्ञानाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या या कार्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
प्रमुख अतिथी राजकुमार अवसारे (मा संचालक, राज्य विज्ञान संस्था रविनगर, नागपूर) यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी ॲक्टिव्हिटी स्वतः करून त्याचा व्हिडिओ बनविणे यामुळे विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाचे आकलन होईल.  या अनुभवामुळे विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरिता प्रोत्साहन मिळेल असे अवसारे यांनी नमूद केले व उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगितले.
प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. संजय ढोले (समन्वयक, एलजी मोबाइल सायन्स लॅबोरेटरी, एसपीपीयू, पुणे, संचालक, संशोधन, विकास आणि गुणवत्ता, ज्ञान प्रसाद ग्लोबल विद्यापीठ, पुणे) यांनी एलजी मोबाइल सायन्स लॅबोरेटरी गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून सायन्स फोरमतर्फे मागील काही वर्षात हा उपक्रम नाशिक शहर विभाग, तसेच ग्रामीण विभागाकरिता राबवित आहे. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागण्यास नक्कीच मदत होईल असे नमूद केले.
ऑनलाइन मार्गदर्शन करताना ढोले यांनी सायन्स फोरम गेल्या कित्येक वर्षापासून शिक्षकांकरिता कार्यशाळा घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्ष अविनाश शिरोडे (माजी अभियंता, इस्रो) यांनी कृती-आधारित अध्ययनाचे महत्व स्पष्ट केले व त्यांनी घरी पवनचक्की तयार करून त्यामधून अनेक संकल्पना शिकण्याचे नमूद केले. त्यांचे इस्रोमधील अनुभव सांगून जगामध्ये बऱ्याच देशांमध्ये काम केल्याचे सांगितले. शिरोडे यांनी सुरू केलेले विविध पुरस्काराची माहिती  थोडक्यात  सांगितली.
कार्यशाळा उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. मधुकर शेलार, सीएमसीएस महाविद्यालय, प्रा. भास भामरे, प्रा. नीलिमा उगावकर  माजी प्राचार्य डॉ. वसंत बर्वे यांची विशेष उपस्थिती होती. सायन्स फोरम नाशिकच्या वतीने डॉ. प्रकाश लांडगे, डॉ. प्रविण जोशी यानी कार्यक्रमाचे नियोजन पार पाडले. प्रा. नीलिमा उगावकर यांनी आभार मानले.
नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष विनित पवार यानी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट करतानाच इन्स्पायर अवार्ड मानक योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले. जिल्हा तसेच तालुका विज्ञान अध्यापक संघ, सर्व शैक्षणिक संस्था आणि विज्ञान शिक्षक यांच्या परस्पर सहकार्याने शासनाच्या अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा, विज्ञान प्रदर्शन, विज्ञान नाट्यमहोत्सव, इन्स्पार अवार्ड मानक यासारख्या उपक्रमामध्ये सहभाग वाढावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हा विज्ञान अध्यापक संघाच्यावतीने दत्तराज ह्याळीज, रमाकांत भामरे, समाधान पावर आदी पदाधिकारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यरत होते.
डॉ. जयंत जोशी यांच्या प्रात्यक्षिकानंतर पाठ्यकृती पाठशाळा व्हिडिओ बनविण्याच्या राज्यस्तरीय स्पर्धे संदर्भात मार्गदर्शक व शिक्षक यांच्यामध्ये अतिशय सलोख्याने चर्चा करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व शिक्षकांना कार्यशाळा सहभाग प्रमाणपत्र  देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
—

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.