नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर, सिडको येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये लहान मुलांच्या लोकप्रिय लेखिका ज्युलिया डोनाल्डसन यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, त्यांना आपल्या आवडत्या गोष्टी इतरांसोबत शेअर करण्यास प्रोत्साहित करणे तसेच त्यांची सर्जनशीलता आणि संवादकौशल्य विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या आणि त्यांना आवडलेल्या पुस्तकांविषयी माहिती दिली. तसेच रंगीबेरंगी छोट्या कार्डांवर आपल्या आवडत्या पुस्तकांची नावे लिहून ती पुस्तके आवडण्यामागची कारणेही सांगितली. या उपक्रमाला अधिक खास बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर्गाबाहेरील सूचना फलकावर ज्युलिया डोनाल्डसन यांच्यासाठी वाढदिवसाच्या केकचे आकर्षक चित्र सजवले.
या आनंददायी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि विचारांची देवाणघेवाण करण्याची वृत्ती विकसित झाली. पुस्तकांशी मैत्री जोडणारा आणि कथांच्या विश्वात रमवणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.
—