नाशिक : प्रतिनिधी
गंगापूर रोड येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये खंडे नवमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही आयुध पुजनाचा कार्यक्रम सोमवारी (दि. 19 ऑक्टोबर) मोठ्या उत्साहात झाला. संस्थेचे संचालक राजेश दरगोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक व भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर संस्थेतील विविध कार्यशाळांमध्ये वापरण्यात येणारी यंत्रे, अवजारे, हत्यारे व तांत्रिक साहित्य यांचे पूजन करण्यात आले.
संचालक दरगोडे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना खंडे नवमीच्या शुभेच्छा दिल्या. आयुध पूजनाच्या या मंगलप्रसंगी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना उत्तम तांत्रिक कौशल्य प्राप्त होवो, तसेच कौशल्याचा उपयोग राष्ट्राच्या उभारणीसाठी करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
खंडी नवमी निमित्त प्रशिक्षणार्थ्यांनी आपापल्या कार्यशाळांची स्वच्छता करून परिसर सुशोभित केला होता. आकर्षक आणि सुंदर रांगोळ्या रंगबिरंगी फुले आणि सुंदर सजावटीमुळे प्रत्येक कार्यशाळेला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते. प्रशिक्षणार्थ्यांनी आपापल्या व्यवसायासंबंधीत अवजारे, हत्यारे, साहित्यांचे श्रद्धेने पूजन केले. या उपक्रमातून स्वच्छतेचे महत्व, कामाप्रती आदर, साधनांची निगा आणि श्रम संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित झाले.
यावेळी आयटीआयचे प्राचार्य नितीन काळे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याने आपल्या व्यवसायातील कौशल्य प्राप्त आत्मसात करून मेहनत, शिस्त व जिद्दीच्या बळावर उज्वल भविष्य घडवावे, असे सांगून त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी गटनिदेशक साहेबराव हेंबाडे, गटनिदेशक उमेश पालवे, निदेशक आनंद जाधव, मधुकर वाघेरे, मधुकर सानप, संदीप काजळे, गोकुळ बेदाडे, मोहन पवार, सुशील लोहकरे, योगेश गांगोडे, जय शिंत्रे, सोनाली खिराडी, अमोल नागरे, राहुल सानप, भारती नागरे आदी कर्मचारी उपस्थित होते.
कौशल्याला मिळो पूजनाचे बळ, श्रमांना मिळो यशाची साथ आणि ज्ञानाच्या प्रकाशातून घडो राष्ट्राच्या प्रगतीचा नवा अध्याय अशा सकारात्मक वातावरणात आयुध पूजन सोहळा संपन्न झाला.
—