सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करणे या उपक्रमाचे आयोजन

0

नाशिक  : प्रतिनिधी
सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राथमिक विभागात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी कला तासात टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवणे हा उपक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. यावर्षीच्या उपक्रमाचा विषय ‘पाकीट तयार करणे’ असा असून, विद्यार्थ्यांनी झेप्टो आणि ब्लिंकिट यांच्या वापरलेल्या कागदी पिशव्यांपासून आकर्षक व उपयुक्त लिफाफे तयार केले.
आजकाल ऑनलाइन खरेदीमुळे मोठ्या प्रमाणावर कागदी पिशव्यांचा वापर होतो आणि त्या वापरल्यानंतर अनेकदा टाकून दिल्या जातात. या पार्श्वभूमीवर पुनर्वापराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना घरातील वापरलेल्या कागदी पिशव्या शाळेत आणण्यास प्रोत्साहित करण्यात आले. अवघ्या पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणावर पिशव्या जमा झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज किती कागदी कचरा निर्माण होतो, याची जाणीव झाली.
कला शिक्षिकेच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या पिशव्यांपासून सुंदर, आकर्षक व उपयोगी लिफाफे तयार केले. हे लिफाफे लग्नसमारंभ, वाढदिवस तसेच विविध शुभप्रसंगी भेटवस्तू देण्यासाठी वापरता येऊ शकतात.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना  टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर या संकल्पनेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले आणि टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने पुनर्वापर करून त्यांना उपयुक्त रूप देता येते, हा संदेश देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत सर्जनशीलतेचे उत्कृष्ट दर्शन घडवले. पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करून आपल्या छोट्या-छोट्या कृतींमधून पृथ्वी अधिक स्वच्छ व हिरवीगार ठेवण्याचा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. हा उपक्रम अत्यंत आनंददायी, प्रेरणादायी आणि यशस्वी ठरला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.