नाशिक : प्रतिनिधी
चौरस आहार आणि निरोगी मन हीच शाश्वत जीवनाची गुरुकिल्ली आहे. आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी आरोग्याकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहन अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. कृष्णा शहाणे यांनी केले.
येथील आर. एन. सी. आर्ट्स, जे. डी. बी. कॉमर्स ॲण्ड एन. एस. सी. सायन्स महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळाच्यावतीने ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद : जागर आरोग्याचा’ या उपक्रमांतर्गत आरोग्यदायी जीवनशैली या विषयावर वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. वैभव महाजन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
डॉ. वैभव महाजन म्हणाले की, आजच्या धावपळीच्या युगात आपल्याला आपले शरीर आणि मनाचे व्यवस्थापन करता आले पाहिजे. मानवी जीवनात प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. योग्य दिनचर्या, सकस आहार आणि सकारात्मक विचारसरणी यातूनच निरोगी जीवनाचा पाया रचला जातो.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विद्यार्थिनी कावेरी भावसार हिने उपस्थितांना आरोग्य प्रतिज्ञा दिली.
डॉ. उत्तम करमाळकर यांनी सूत्रसंचालन केले. मदिहा शेख हिने आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—
विद्यार्थ्यांनी आरोग्याकडे गांभीर्याने पहावे : प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे
Get real time updates directly on you device, subscribe now.