नवी दिल्ली : प्रतिनिधी
महानुभाव पंथाच्या ग्रंथांनी मराठी भाषेच्या प्राचीनत्वाचे, समृद्ध साहित्यपरंपरेचे आणि स्वतंत्र भाषिक स्वरूपाचे महत्त्वपूर्ण पुरावे उपलब्ध करून दिले. लीळाचरित्र या बीजग्रंथांमुळे मराठीच्या प्राचीन साहित्यपरंपरेला भक्कम आधार मिळतो. त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्याच्या प्रक्रियेत महानुभाव साहित्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले, असे प्रतिपादन भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. चमू कृष्ण शास्त्री यांनी महाराष्ट्र सदन, दिल्ली येथील राष्ट्रीय चर्चासत्रात केले.
भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र परिचय केंद्र (नवी दिल्ली), मराठी भाषा विद्यापीठ, (रिद्धपूर, अमरावती) यांच्या समन्वयाने ‘महानुभाव साहित्याचे अभिजातत्त्व’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र, तर ‘महाराष्ट्राच्या जडणघडणीत महानुभाव पंथाचे योगदान’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद संपन्न झाला. महानुभाव साहित्याची समृद्ध परंपरा, वैचारिक वारसा तसेच मराठी भाषेच्या विकासासह महाराष्ट्राच्या सांस्कृतीक जडणघडणीत महानुभाव पंथाच्या योगदानावर विस्तृत चर्चा झाली. कार्यक्रमाचे समन्वयन हरिहर पांडे, नागपूर यांनी केले.
महोत्सवाच्या समारोपिय सत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे विचार व तत्त्वज्ञान समजून घेऊन ते मन, शरीर आणि आत्म्यात रुजविल्यास मानवी जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येते. शेकडो वर्षांपूर्वी मानव कल्याणासाठी स्वामींनी मांडलेले विचार आजच्या काळातही समाजनिर्मिती आणि मानवी जीवन सुखी करण्यासाठी तितकेच मार्गदर्शक असल्याचे सांगून श्रीचक्रधर स्वामी यांच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा गौरव केला. यावेळी मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अविनाश आवलगावकर, महाराष्ट्र परिचय केंद्र, दिल्ली येथील संचालक हेमराज बागुल, उपाध्यकुलाचार्य महंत श्रीवर्धनस्थ बिडकरबाबा, कवीश्वरकुलाचार्य महंत श्रीकारंजेकर बाबा, डॉ. बाबासाहेब बिडकर, राज्य शासनाच्या विधी सल्लागार डॉ. किर्ती कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार अजित चव्हाण, हरिहर पांडे या मान्यवरांसह महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, पंजाब, जम्मू- काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश येथील महानुभाव पंथियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
प्राचीन हस्तलिखित . ग्रंथप्रदर्शन
नवीन महाराष्ट्र सदन, दिल्ली येथे प्राचीन हस्तलिखित आणि ग्रंथप्रदर्शनाच्या दालनात महानुभाव साहित्य परंपरेशी संबंधित दुर्मिळ, प्राचीन आणि महत्त्वपूर्ण ग्रंथांसह तीर्थस्थानांची दुर्मिळ छायाचित्रे, १२ व्या शतकातील भडोच येथील नकाशा, श्रीगोपिराज ग्रंथसंग्रहातील प्राचीन वस्तू तर वाजेश्वरी आणि रिद्धपूर मठ या प्रतिकृतीचा समावेश होता. याठिकाणी प्रथमच प्राचीन संपदेचे दर्शन घडले, अशी प्रतिक्रीया यूपीएससीची विद्यार्थिनी जान्हवी रोखले यांनी दिली.
—