नाशिक : प्रतिनिधी
श्रीक्षेत्र अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथील श्रीचक्रधर स्वामी मंदिर, परिसरात सोमवारी ( दि. २६ ) महानुभाव पंथाचा विशेष मेळावा, ‘स्थान, प्रसाद, वंदन, संत-महंत वासनिक भेट’, तसेच देवपूजा वंदन, विडा अवसर आणि पंचावतार उपहार विधी सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.
आगामी सिंहस्थ पर्वणीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सोहळ्यात सकाळपासूनच संत-महंत आणि वासनिक भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. या निमित्ताने उपस्थित भाविकांना ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर, अंजनेरी, गंगापूर आणि नाशिक येथील गोदावरी काठावरील पवित्र स्थानांच्या वंदनाचा लाभ मिळाला.दरम्यान जिल्ह्यातील सर्व महानुभाव पंथीय तीर्थस्थानांना उटी व विडा अवसर व वस्त्र समर्पण करण्यात आले.
प्रातःकालीन विधी, सकाळी ६ वाजता जिल्ह्यातील सर्व वंदनीय स्थानांना उटी व विडा अवसर अर्पण करून सोहळ्याचा प्रारंभ झाला. त्यानंतर सकाळी ७ ते ८:३० या वेळेत अंजनेरी येथे श्रीभगवद्गीता पाठाचे पारायण करण्यात आले.
सकाळी ९:१५ वाजता महंत नागराज बाबा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महंत गोविंदराज बाबा यांनी ध्वजगीत सादर केले. त्यानंतर देवपूजा, स्थानवंदन आणि वैयक्तिक विडा अवसर विधी पार पडला. सकाळी १० ते ११:३० वा. सभा मंडपाचे उद्घाटन महंत विद्वांस बाबा ( फलटण ) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री चक्रधर सेवा मंडळ, अंजनेरी यांच्या वतीने उपस्थित संत-महंतांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. यावेळी महंतांनी उपस्थित साधकांना मोलाचे प्रबोधन केले. याप्रसंगी सभेच्या अध्यक्षस्थानी महंत खामणीकर बाबा उपस्थित होते.
यावेळी महंत नागराजबाबा शास्त्री, महंत कानळस्कर बाबा (बक्तपुर), महंत विद्वांस बाबा शास्त्री (फलटण ), भागवताचार्य चिरडे बाबा (निफाड), नाशिक मनपाचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आण्णा पाटील, माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात महंत खामणीकर बाबा यांनी सिंहस्थ कुंभमेळा आणि महानुभाव पंथाचे कार्य याविषयी विवेचन केले. व्यासपीठावर महानुभाव परिषदेचे राज्याध्यक्ष प्रकाश नन्नावरे , जिल्हाध्यक्ष महंत दत्तराज पालीमकर, महंत चक्रपाणी बाबा कोठी, महंत मुरारीमल्ल बास आदी उपस्थित होते.
याप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब सानप यांची अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध संस्था व संघटनांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले. प्रास्ताविक महंत कृष्णराज बाबा मराठे यांनी केले. आभार प्रदर्शन महंत गोपीराज शास्त्री सुकेणेकर यांनी केले. दरम्यान , संत-महंतांच्या शुभ हस्ते महापूजा, पंचावतार उपहार विधी आणि भावपूर्ण आरती पार पडली. त्यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
याप्रसंगी वाल्हेराज बाबा पातुरकर, सायराज बाबा लोणारकर, मयंकर बाबा, व्यवस्थापक महंत गोविंदराज बाबा अंकुळेकर, अक्षय बाबा कपाटे, नंदू भाऊ हांडे, अनिल जाधव, योगीराज दादा, गोपीराज चिरडे, बदादे, दतात्रेय गवळी, चव्हाण, अवसरे, चंद्रकांत आंडे, आडके, व्यवस्थापक भिका बेंडकोळी, भास्करराव सोनवणे, प्रभाकर पवार, तसेच संत – महंत, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक जिल्हा निवासी पंथीय सद्भक्त आणि सर्वज्ञ सेवा महिला मंडळ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याचे नेटके नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामुळे संपूर्ण अंजनेरी परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला होता.
—