अभ्यासाबरोबर क्रीडा क्षेत्रातील सहभागाने सर्वांगीण विकासास मदत – प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे

नाशिक विभागीय बुद्धिबळ स्पर्धेचे रंगले डावपेच

0

नाशिक रोड : प्रतिनिधी
बुद्धिबळ हा केवळ मनोरंजनाचा खेळ नसून एकाग्रता, संयम, नियोजन, निर्णयक्षमता व चिकित्सक विचारशक्ती विकसित करणारा खेळ आहे, असे प्रतिपादन बिटको महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णा शंकर शहाणे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने नाशिक विभागीय बुद्धिबळ स्पर्धांचे उद्घाटन बिटको महाविद्यालय येथे नुकतेच झाले त्याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. त्यांनी आपला भाषणात पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही सातत्याने सहभाग घेऊन सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साधावा.
गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, नाशिक रोड (बिटको कॉलेज) येथे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने शालेय विभागीयस्तर बुद्धिबळ स्पर्धा २०२६-२७ संपन्न होत आहेत. दि. ४ व ५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या या स्पर्धेत नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव व मालेगाव जिल्ह्यांतील १४, १७ व १९ वर्षांखालील खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील व क्रीडा मार्गदर्शक प्रीती करवा उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळात यश मिळविण्यासाठी चिकाटी, जिद्द, शिस्त व सातत्य आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच अभ्यास आणि क्रीडा यांचा समतोल साधण्याचा सल्ला दिला.

कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या राधा पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक दत्ता शिरसागर उपस्थित होते. बुद्धिबळ स्पर्धेसाठी पंच म्हणून मंगेश गंभीरे यांनी जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडाशिक्षक योगेश शिंदे, वरिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रा. धनंजय बर्वे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी विठ्ठल कोठुळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही स्पर्धेच्या नियोजनासाठी विशेष सहकार्य केले.
समारोपप्रसंगी बुद्धिबळ क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना बुद्धिबळातील बारकावे, एकाग्रता, स्पर्धात्मक शिस्त आणि सातत्य याविषयी मार्गदर्शन केले. सहभागी खेळाडू तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या बुद्धिबळ कौशल्याचे प्रदर्शन करण्यासोबतच उच्चस्तरीय स्पर्धेचा अनुभव मिळाला. बिटको महाविद्यालयाने नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
—

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.