श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे पाच कोटीचा निधी मंजूर : महंत कारंजेकर बाबा

0

नाशिक : प्रतिनिधी
शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेतून राज्यातील महानुभाव तीर्थस्थानाची अनेक कामे पूर्ण झाले असून काही प्रगतीपथावर आहेत. तसेच त्या स्थानांना जोडण्यासाठी सर्वज्ञ अष्टशताब्दी महामार्गाचे काम सुरू आहे. श्री क्षेत्र रिद्धपूर येथे जगातले पहिले मराठी विद्यापीठ स्थापन झाले असून त्या ठिकाणी अध्ययन सुरू झाले आहे. श्रीक्षेत्र जाळीचादेव येथेही भक्त निवास व सभामंडपासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून चोवीस कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. त्यालाही लवकरच मान्यता मिळणार असल्याची माहिती अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत कारंजेकर बाबा यांनी दिली.
श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे अखिल विश्व भोपे पुजारी समाज सत्कार समारंभ तथा पदग्रहण सोहळ्यात महंत कारंजेकर बाबा बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महंत लासुरकर बाबा (पिंप्राळा) उपस्थित होते. महंत महंत मेहकरकर बाबा यांच्या हस्ते सभा मंडपाचे उद्घाटन, तर अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष महंत लोणारकर बाबा रिद्धपूरकर बाबा यांच्या हस्ते यावेळी दीप प्रज्वलन करण्यात आले. महंत चिचोंडीकर बाबा यांनी यावेळी भोपे पुजारी समाजाची प्राचीन माहिती देऊन या समाजाचा पूर्ण इतिहास सांगितला. अखिल विश्व भोपे पुजारी महानुभाव समाज अध्यक्षपदी प्रभाकर भोजने यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महंत बिडकर बाबा (रणाईचे) माजी आमदार बाळासाहेब सानप, प्रकाश नन्नवरे, प्रभाकर भोजने, दत्तात्रय गवळी (नाशिक), शेंदुणींचे नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल, अरुण महानुभाव यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील महानुभाव पंथीय निवडून आलेल्या नगरसेवक, नगराध्यक्ष, भोपे पुजारी समाजातील गुणवंत विद्यार्थी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महंत आंबेकर बाबा, महंत भीष्माचार्य बाबा, महंत पाथरीकर बाबा, महंत खामनिकर बाबा (कनाशी) आदी संत महंत यावेळी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.