नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकमधील मूलभूत सुविधा व पायाभूत विकासकामांना गती देण्याची मागणी म्हसरूल स्थित प्रभाग क्रमांक १ चे शिवसेनेचे नगरसेवक प्रविण जाधव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, प्रभाग क्रमांक १ मधील सीता सरोवर परिसराचा विकास, तसेच म्हसरूळ – वरवंडी, म्हसरूळ – आडगाव आणि किशोर सूर्यवंशी मार्ग या प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व मजबुतीकरण करणे अत्यावश्यक आहे. सिंहस्थ काळात भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होत असल्याने या भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ही कामे तातडीने हाती घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सीता सरोवर हे धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ असून येथे स्वच्छता, सौंदर्यीकरण व भाविकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आहे. तसेच, म्हसरूळ – वरवंडी हा रस्ता नाशिक विमानतळाकडे जाणारा पर्यायी मार्ग असल्याने त्याचे पूर्ण रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
किशोर सूर्यवंशी मार्ग हा प्रस्तावित आऊटर रिंग रोडला जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून त्याचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे. तसेच म्हसरूळ – आडगाव मार्ग हा मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा प्रमुख मार्ग असल्याने त्याच्या रुंदीकरणासह मजबुतीकरण तातडीने करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, या सर्व कामांचा समावेश सिंहस्थ आराखड्यात करून तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी नगरसेवक जाधव यांनी केली असून प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
—
कुंभमेळ्यामुळे म्हसरूळमधील (प्रभाग क्र. – 1) विकासकामांना मंजुरीची मागणी
नगरसेवक प्रवीण जाधव यांचे कुंभमेळा आयुक्तांना निवेदन
Get real time updates directly on you device, subscribe now.
Next Post