नाशिक : प्रतिनिधी
येथील अशोका एज्युकेशन्स फाउंडेशन संचलित, पुणे विद्यापीठ संलग्नित आणि नॅक प्रमाणित ‘अशोका सेंटर फॉर बिझनेस ॲण्ड कॉम्प्यूटर स्टडीज’ चांदशी महाविद्यालयात शिक्षकांसाठी पाच दिवशीय ‘फॅकल्टी इंडक्शन प्रोग्राम’ चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या आयक्यूएसी विभागामार्फत या विशेष सत्राचे आयोजन ०१ जून २०२६ ते ५ जून २०२६ मध्ये करण्यात आले होते. शिक्षकांना महाविद्यालयातील विविध विभागांच्या कार्यपद्धतीची ओळख करून देणे आणि त्यांच्या व्यावसायिक कौशल्यांचा विकास करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी आयक्यूएसी विभागप्रमुख डॉ. मनिषा शिरसाठ यांनी सत्राचे प्रास्ताविक केले. प्रभारी प्राचार्या डॉ. हर्षा पाटील यांनी शिक्षकांना या प्रेरणादायी सत्राच्या उद्देशाबाबत मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात संस्थेचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांनी ‘तणाव व्यवस्थापन’ या विषयावर दैनंदिन उदाहरणे देत तणाव निवारणाचे उपाय सांगितले. दुसऱ्या सत्रात प्रमाणित पॉश प्रशिक्षक डॉ. लीना गोऱ्हे यांनी ‘पॉश कायदा जागरूकता’ या विषयांतर्गत कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाला प्रतिबंध करणाऱ्या कायद्याची मुख्य वैशिष्ट्ये समजावून सांगितली.
दुसऱ्या दिवशी डॉ. मनिषा शिरसाठ यांनी आयक्यूएसीचे कार्य आणि नॅकच्या सात निकषांची माहिती दिली, तर जयश्री दराडे यांनी नवीन शैक्षणिक दिनदर्शिका, सीओ/पीओ आणि मायक्रोप्लॅनवर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात बीएस्सी (सीएस) विभागप्रमुख सोनाली इंगळे यांनी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप आणि ‘आयएसओ’ पद्धतीचे महत्त्व स्पष्ट केले.
तिसऱ्या दिवशी पुणे येथील एसएनडीटी महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या डॉ. चित्रा सोहनी यांनी ऑनलाइन सत्राद्वारे ‘ब्लूम्स टॅक्सोनॉमी’ आणि अध्यापनातील विविध स्तरांवर सखोल प्रकाश टाकला.
चौथ्या दिवशी चांदवड येथील एसएनजेबी महाविद्यालयाचे व्याख्याता डॉ. महेश सिंघवी यांनी ‘अध्यापनात ए आय टूल्सचा प्रभावी वापर’ कसा करावा, याचे थेट प्रात्यक्षिक दाखवले. त्यानंतरच्या सत्रात एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या शिक्षण विभागाच्या बीओएस सदस्य डॉ. लीना पिंपले यांनी शिक्षकांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ‘सीओ/पीओ मॅपिंग’ची संकल्पना व त्याची अचूक कार्यपद्धती स्पष्ट केली.
सत्राच्या शेवटच्या दिवशी प्रथम सत्रात संस्थेचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांनी ‘प्रभावी अहवाल लेखन कौशल्ये’ या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन करत अहवालाचे स्वरूप आणि पद्धत समजावून सांगितली. समारोपाच्या अंतिम सत्रात प्रिया बुदलानी यांनी शिक्षकांसाठी ‘अध्यापन-अध्ययन’ या विषयावर एका विशेष कृतीसत्राचे आयोजन केले होते, ज्यामध्ये शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गामुळे महाविद्यालयातील प्राध्यापकांना आधुनिक तंत्रज्ञान, कायदेशीर बाबी, शैक्षणिक नियोजन आणि मानसिक आरोग्य या सर्वच आघाड्यांवर मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे सत्र अत्यंत फायदेशीर ठरल्याची भावना उपस्थित प्राध्यापकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रेवती नायर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन आयक्यूएसी विभागप्रमुख डॉ. मनीषा शिरसाठ आणि सुजाता कातकाडे यांनी केले.
सत्राकरिता संस्थेचे डॉ. अशोक कटारिया, विश्वस्त आस्था कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे आणि प्रभारी प्राचार्या डॉ. हर्षा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
—