नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर, सिडको येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसमवेत मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रमाला भेट देऊन प्रेम, आपुलकी, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश दिला.
या उपक्रमाअंतर्गत शाळेत विशेष कुकिंग ॲक्टिव्हिटी आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी मिळून प्रेमाने विविध खाद्यपदार्थ व जेवण तयार केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना स्वतःच्या हाताने जेवण वाढले. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांच्या अनुभवांना ऐकले आणि त्यांच्यासोबत आनंदाचे अविस्मरणीय क्षण घालवले. विद्यार्थ्यांच्या प्रेमळ सहवासामुळे आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि आनंदाचे हास्य फुलले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, माणुसकी, सहानुभूती, ज्येष्ठांचा आदर, कृतज्ञता आणि सामाजिक उत्तरदायित्व यांसारखी जीवनमूल्ये प्रत्यक्ष कृतीतून रुजली. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यातच खरा आनंद असतो, याची अनुभूती विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या संस्थापिका सुमन दत्ता, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
—