नाशिक : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनच्यावतीने सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी जपत श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कौळाणे (नि.), ता. मालेगाव येथे इयत्ता १० वीच्या ५० विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या राजआकांक्षा स्टडी ॲप चे मोफत वितरण करण्यात आले.
आधुनिक शिक्षण पद्धतीत ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे राहू नयेत व आगामी बोर्ड परीक्षेची पूर्वतयारी उत्कृष्ट व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. या प्रकल्पाचे संपूर्ण संयोजन व पुढाकार काशिनाथ देसाई यांनी घेतला. याप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षक, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकल्प यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नासिक मिडटाऊनचे डी. आर. पाटील, दिलीप चव्हाण, अवतारसिंग पनफैर, दिलीप काळे, अजय जाधव, तसेच सह-सचिव नलिन राजपूत, तसेच मुख्याध्यापक प्रशांत पवार, शांताराम देसाई, आशुतोष पवार, आण्णा पाटील, श्रीराम शिरसाठ यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
यावेळी काशिनात देसाई यांनी स्टडी ऍपचे महत्व व वापरायची पद्धत या बद्दल सविस्तर माहिती दिली. दिलीप काळे यांनी रोटरी मिडटाऊनतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. सहसचिव नलिन राजपूत यांनी आभार मानले.
उपक्रमानंतर सदस्यांनी स्थानिक ऐतिहासिक वास्तू असलेल्या श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या राजवाड्याला सदिच्छा भेट दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थेट डिजिटल शिक्षणाचा लाभ मिळवून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी रोटरी क्लबचे आभार मानले.
—
रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनतर्फे कौळाणे (नि.) येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक ‘राजआकांक्षा ॲप’ चे वाटप
Get real time updates directly on you device, subscribe now.