नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर, सिडको येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये ‘स्प्लॅशी डे’ जल्लोषात साजरा झाला. पावसाळा म्हणजे आनंद, प्रसन्नता आणि नवचैतन्य घेऊन येणारा ऋतू. या ऋतूचे सौंदर्य अनुभवण्याची आणि खेळता-खेळता शिकण्याची संधी चिमुकल्यांना मिळावी, या उद्देशाने ‘स्प्लॅशी डे’चे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
ज्युनिअर के.जी.च्या चिमुकल्यांनी रंगीबेरंगी रेनकोट परिधान करून, या आनंदोत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला. पाण्यात मनसोक्त खेळणे, कागदी होड्या पाण्यात सोडणे, डबक्यात उड्या मारणे, छोट्या पूलमध्ये खेळणे, तसेच चिखलातील खेळांचा आनंद घेताना त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता.

यावेळी चिमुकल्यांनी पावसाळी गाण्यांच्या तालावर मनमुराद नृत्य केले. मित्र-मैत्रिणींसोबत खेळताना त्यांनी हास्य-विनोद आणि आनंदाचे क्षण अनुभवले. पावसाळ्यातील खास खाद्यपदार्थ म्हणून मुलांना स्वादिष्ट स्वीट कॉर्नचा आस्वादही देण्यात आला.
चिमुकल्यांच्या निरागस हास्याने, उत्साहाने आणि जल्लोषाने ‘स्प्लॅशी डे’ हा अविस्मरणीय ठरला. आनंद, मैत्री, खेळ आणि अनुभवातून शिकण्याची सांगड घालणारा हा दिवस प्रत्येक चिमुकल्याच्या मनात सुंदर आठवणी निर्माण करून गेला. प्रत्येक पाण्याच्या थेंबासोबत उमटलेला आनंदाचा क्षण त्यांच्या बालपणीच्या आठवणींमध्ये कायमचा दरवळत राहील.
—