नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या प्राथमिक विभागात जागतिक योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत निरोगी जीवनाचा संदेश दिला.
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध योगासने, स्ट्रेचिंग व्यायाम, तसेच अनुलोम-विलोम यांसारख्या प्राणायामाचा सराव केला. विशेषतः इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगाभ्यासाचे महत्त्व अनुभवले.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. योगामुळे शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न व शांत राहते, तसेच एकाग्रता, शिस्त आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनीही योग ही केवळ एका दिवसाची कृती नसून आयुष्यभर जोपासण्याची जीवनशैली आहे, हा संदेश आत्मसात केला.
लहानपणापासूनच व्यायाम आणि योगाची सवय लागल्यास निरोगी शरीर, तल्लख बुद्धी आणि आनंदी मन घडते, असा विश्वास सेंट लॉरेन्स परिवार व्यक्त करतो. शांत ध्यानाने कार्यक्रमाची सांगता झाली आणि सर्वांनी निरोगी जीवनाचा संकल्प केला.
—
सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
Get real time updates directly on you device, subscribe now.
Prev Post