नाशिक : प्रतिनिधी
तापी पूर्णा उत्कृष्ट समाजसेवक राष्ट्रीय पुरस्कार नाशिक येथील डाॅ. प्रीती कृष्णा शहाणे यांना जाहीर झाला आहे. डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन (मुक्ताईनगर) यांच्यावतीने हा पुरस्कार देण्यात येणार आहे. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर आणि उत्तर महाराष्ट्र प्रमुख डॉ. रमाकांत जाधव यांनी ही माहिती दिली आहे. त्रंबकेश्वर येथे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनात त्यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाईल.
नाशिक स्थित डॉ. प्रीती कृष्णा शहाणे यांनी हैदराबाद येथील एम्स तेलंगानामथून एमबीबीएस पदवी नुकतीच पूर्ण केलेली आहे. त्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच त्यांनी वैद्यकीय विद्यार्थी संघटना, तेलंगानाच्या अध्यक्षपदी काम केलेले आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय बंधुत्व संघटनेच्या तेलंगाना प्रदेशाध्यक्षपदी प्रीती शहाणे यांनी भरीव कार्य केलेले आहे.
त्यांच्या या कामगिरीबद्दल आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ यांच्यावतीने नॅशनल एक्सलन्स अँवार्ड, तसेच राष्ट्रीय माणुसकी पुरस्कार अशा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने त्या यापूर्वी सन्मानित झाल्या आहेत.
—