इनर व्हील क्लब ऑफ नाशिक मिडटाउनतर्फे आरोग्यविषयक जनजागृती उपक्रम

0

नाशिक : प्रतिनिधी
इनर व्हील क्लब ऑफ नाशिक मिडटाउनच्या अध्यक्षा डॉ. स्वप्नांजली सुमित आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांसाठी विविध आरोग्यविषयक जनजागृती उपक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. क्लबच्या इतर सदस्यांचेही या उपक्रमांना सहकार्य लाभत असून, आरोग्यविषयक जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने हे उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
१३ ऑक्टोबर रोजी भगतवाडी आदिवासी शाळा, इगतपुरी येथे किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीतील स्वच्छता, पोषण आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. संगीता लोढा आणि डॉ. भक्ती दुगड यांनी मार्गदर्शन केले. जनकल्याण ब्लड सेंटर, नाशिक यांच्या सहकार्याने १७५ मुलींच्या हिमोग्लोबिन तपासण्या करण्यात आल्या.
१६ ऑक्टोबरला शासकीय अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दंततपासणी व दंतस्वच्छता जनजागृती शिबिर घेण्यात आले. डॉ. पूर्वी पटेल आणि अनामिका जैन यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून दातांची काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन केले.
१७ ऑक्टोबरला एल. व्ही. हिरे स्कूल आणि के. बी. हिरे स्कूल येथे ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. संगीता लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १८० विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये अ‍ॅलर्जी प्रतिबंध, संतुलित आहार, जंक फूडचे दुष्परिणाम तसेच ‘गुड टच आणि बॅड टच’ या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
२१ ऑक्टोबरला शासकीय कन्या विद्यालयात १९८ विद्यार्थिनींच्या हिमोग्लोबिन तपासण्या करण्यात आल्या. डॉ. संगीता लोढा आणि डॉ. भक्ती दुगड यांनी पोषण, ॲनिमिया प्रतिबंध आणि मासिक पाळीतील स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले.
या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, पोषण, स्वच्छता आणि वैयक्तिक सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच त्यांना निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. समाजहिताच्या दृष्टीने असे आरोग्यविषयक जनजागृती उपक्रम यापुढेही सातत्याने सुरू राहतील.
—

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.