नाशिक : प्रतिनिधी
आर. एन. सी. आर्ट्स जेडीबी कॉमर्स ॲण्ड एन. एस. सी. सायन्स (बिटको) महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन झाले. ज्येष्ठ्य साहित्य अभ्यासक प्रा. डॉ. दत्तात्रय फलके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे होते.
यावेळी कला शाखा उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. रमाकांत कराड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. फलके यांनी मराठी वाङ्मयाची समृद्ध परंपरा, त्याचे सामाजिक भान आणि समाजाच्या जडणघडणीत मराठी साहित्याने केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाविषयी सविस्तर मनोगत व्यक्त केले. मराठी वाङ्मय हे केवळ साहित्यनिर्मितीचे माध्यम नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. शहाणे यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या काही संस्मरणीय आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी साहित्याची अभिरुची जोपासावी, असे आवाहन केले.
प्रा. राजेश बागुल यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी मराठी वाङ्मय मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. डॉ. उत्तम करमाळकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. गीतांजली चिने यांनी आभार मानले.
याप्रसंगी मराठी विभागातील डॉ. शरद नागरे, डॉ. आरती गायकवाड, डॉ. जयश्री शहाणे, प्रा. गोसावी यांच्यासह मराठी विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—