साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सेवा समितीच्यावतीने पुरस्कार वितरण सोहळ्याचे शुक्रवारी (दि. 2 ऑक्टोबर) आयोजन

0

वासिंद (पू.), ता. शहापूर : प्रतिनिधी

शैक्षणिक, सामाजिक, शासकीय व निमशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती, नाशिक यांच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा–२०२६ , तसेच राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार सोहळा–२०२६ यांचे आयोजन उत्कर्ष कला, वाणिज्य व विज्ञान (आयटी)महाविद्यालय, वासिंद, ता. शहापूर, जि. ठाणे येथे करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा २ ऑक्टोबर २०२६ ला दुपारी १२ वाजता महाविद्यालयाच्या परिसरात होणार आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती, नाशिक ही राज्यस्तरीय नोंदणीकृत तसेच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त संस्था असून, मागील अनेक वर्षांपासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व मार्गदर्शन, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सीईटी, नीट व नवोदय परीक्षेसंदर्भातील मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महिला सक्षमीकरणासाठी व्यवसाय प्रशिक्षण, आरोग्य व नेत्रतपासणी शिबिरे तसेच ‘मुलींच्या जन्माचे स्वागत’ आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यांसारख्या जनजागृतीपर उपक्रमांद्वारे संस्था सामाजिक बांधिलकी जपत आहे.
शिक्षकांच्या शैक्षणिक योगदानाची तसेच शासकीय व निमशासकीय क्षेत्रातील अधिकारी व विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन संस्थेच्यावतीने मागील १४ वर्षांपासून विविध पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याला सार्वजनिक व्यासपीठावर मान्यता देण्याबरोबरच समाजातील सकारात्मक व प्रेरणादायी कार्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. पी. सी. पाटील, संस्थापक अध्यक्ष, ज्ञान विकास संस्था, कोपरखैराणे (नवी मुंबई) हे राहणार आहेत.
कार्यक्रमास सुरेश गोपीनाथ म्हात्रे, खासदार, भिवंडी ग्रामीण लोकसभा, अनंत गोविंद शिसवे, डॉ. रविंद्र अनंत शिसवे (आय.पी.एस.), सचिन पांडुरंग गोरे, डॉ. सोन्या काशिनाथ पाटील, अरुण विठ्ठल वारघडे, तसेच  बाळासाहेब शिरसाठ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करण्याबरोबरच शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि समाजहिताच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुरस्कारप्राप्त मान्यवरांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन
या कार्यक्रमाचे आयोजन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती, नाशिक, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्ष अनिल निरभवणे, सचिव नाना उलारे, मुंबई विभाग अध्यक्ष डॉ. शेषराव मसुडकर, तसेच संस्थेचे इतर सन्माननीय सदस्य यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी समाज हितकारिणी संस्था, वासिंद यांचे अध्यक्ष अरुण वारघडे, उपाध्यक्ष अनिल मानिवडे, सचिव रामदास शेळके, तसेच सर्व संचालक मंडळ यांचे सहकार्य लाभणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यास शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
—

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.