दिंडोरी तालुक्यातील टाइप-१ मधुमेहग्रस्त विद्यार्थ्यांसाठी आरोग्यसेवेचा विशेष उपक्रम

0

नाशिक : प्रतिनिधी

टाइप-१ मधुमेह असलेल्या बालकांना योग्य वैद्यकीय उपचार, नियमित तपासणी आणि आजाराच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत पंचायत समिती दिंडोरीच्या आरोग्य विभागातील, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमामार्फत (आरबीएसके) एक विशेष आरोग्य उपक्रम राबविण्यात आला.

उपक्रमाची पार्श्वभूमी व गरज
टाइप-१ मधुमेह हा असा आजार आहे की, ज्यामध्ये बालकांच्या शरीरात इन्सुलिनची निर्मिती होत नसल्यामुळे त्यांना नियमितपणे इन्सुलिन घेणे, रक्तातील साखरेची तपासणी करणे आणि वैद्यकीय देखरेखीखाली राहणे अत्यंत आवश्यक असते. या उपचारांमध्ये खंड पडल्यास रक्तातील साखरेचे नियंत्रण बिघडून गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. काही वेळा अशा बालकांना अचानक रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. अशा उपचारांचा खर्चही मोठा असू शकतो. दीर्घकाळ रक्तातील साखरेचे योग्य नियंत्रण न राहिल्यास भविष्यात डोळे, मूत्रपिंडे, हृदय आणि मज्जासंस्था यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर दुष्परिणाम होण्याचा धोका असतो.
मात्र, ग्रामीण भागातील विशेषतः हातमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक कुटुंबांसाठी हा नियमित उपचारांचा खर्च पेलणे कठीण असते. इन्सुलिन इंजेक्शन, ग्लुकोमीटर स्ट्रिप्स, तपासणी शुल्क, आवश्यक रक्ततपासण्या आणि प्रवासाचा खर्च विचारात घेतल्यास एका विद्यार्थ्यामागे साधारणतः दरमहा पाच ते सहा हजार रुपये खर्च येऊ शकतो. कुटुंबाच्या मर्यादित उत्पन्नातून हा खर्च करणे आणि तेही सातत्याने करणे अनेक पालकांसाठी मोठे आव्हान ठरते. आर्थिक अडचणींमुळे काही वेळा आवश्यक तपासण्या किंवा उपचार पुढे ढकलले जाण्याची शक्यता असते. परंतु या आजारात उपचारांमधील अनियमितता बालकांच्या आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते.

हीच समस्या लक्षात घेऊन दिंडोरी तालुक्यातील इन्सुलिनवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना योग्य उपचार आणि तज्ज्ञ वैद्यकीय मार्गदर्शनाशी जोडण्याचा निर्णय आरोग्य विभागामार्फत घेण्यात आला. या उपक्रमाचा मूळ उद्देश बालकांचे आरोग्य जपणे हा असला, तरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या ग्रामीण पालकांना औषधोपचार व आवश्यक वैद्यकीय सुविधांच्या माध्यमातून आर्थिक आधार देणे आणि त्यांच्या कुटुंबावरील आरोग्यखर्चाचा भार कमी करणे हाही तितकाच महत्त्वाचा उद्देश आहे.

विशेष यंत्रणांची सांगड आणि सहकार्य
दिंडोरी तालुक्यातील अंगणवाडी आणि शाळांमधील आरोग्य तपासणीदरम्यान टाइप-१ मधुमेह असलेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना पुणे येथील हिराबाई कोवासजी जहांगीर मेडिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट (एचसीजेएमआरआय) संचलित स्वीटलिंग्ज – सेंटर ऑफ एक्सलन्स फाॅर टाईप 1 डायबेटिस या केंद्राशी जोडण्यात आले.

आरोग्य विभाग व आरबीएसके : गटविकास अधिकारी सुनील पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत घांगळे, बालरोग तज्ज्ञ डॉ. समीर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच सर्व आरबीएसके पथकांनी विद्यार्थ्यांची माहिती गोळा केली आणि डॉ. तुषार पाटील यांनी सर्व पालकांचे समुपदेशन केले.

एचसीजेएमआरआय पुणेचे योगदान : डॉ. अनुराधा खाडीलकर, डॉ. शीतल भोर आणि त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांची तपासणी, इन्सुलिन व ग्लुकोमीटर पुरविणे, आहारविषयक सल्ला आणि योग्य मार्गदर्शनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

रोटरी क्लबचे आर्थिक सहकार्य : दिंडोरी ते पुणे प्रवासाचा आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटीचे अमित घरटे यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली.

भविष्याची नवी दिशा

शासकीय आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय संशोधन संस्था आणि सामाजिक संस्था यांच्या समन्वयातून राबविलेला हा उपक्रम केवळ उपचारांपुरता मर्यादित नसून, आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही बालकाचे उपचार थांबू नयेत आणि पालकांवरील आरोग्यासाठीचा आर्थिक भार कमी व्हावा, हा याद्वारे प्रयत्न केला गेला आहे. या संवेदनशील उपक्रमामुळे टाइप-१ मधुमेह असलेल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आरोग्याची नवी आशा आणि आत्मविश्वासाची दिशा निर्माण झाली आहे.
—

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.