नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर, सिडको येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शाश्वत विकास उद्दिष्ट – स्वच्छ पाणी आणि स्वच्छता या विषयाअंतर्गत ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ हा महत्त्वपूर्ण संदेश देणारा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एका अर्थपूर्ण पथनाट्याद्वारे पाण्याचे महत्त्व आणि जलसंवर्धनाची गरज प्रभावीपणे मांडली. दात घासताना नळ बंद ठेवणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि प्रत्येक थेंबाचा योग्य वापर करणे अशा छोट्या सवयींमधून पाण्याची बचत कशी करता येते, हे विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून दाखवून दिले.
या कार्यक्रमातून पाण्याची बचत करणे आणि जलप्रदूषण रोखणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांना पाण्याचा जपून वापर करण्याची तसेच निसर्गातील या अमूल्य संसाधनाचे संरक्षण करण्याची प्रेरणा मिळाली.
अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करून त्यांना जबाबदार नागरिक बनवण्याचा शाळेचा प्रयत्न आहे. ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ हा संदेश प्रत्येकाच्या मनात रुजवून जलसंवर्धनासाठी कृती करण्याची प्रेरणा या कार्यक्रमाने दिली.
—