नाशिक : प्रतिनिधी
माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कार्यक्रम झाला. केवळ स्वप्ने पाहू नका तर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अथक परिश्रम करा, असा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात आला.
आयटीआयचे प्राचार्य नितीन काळे यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य काळे यांनी डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर प्रकाश टाकला. अत्यंत सामान्य परिस्थितीतून आपली बुद्धिमत्ता, जिद्द आणि अथक परिश्रमांच्या बळावर देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचणाऱ्या डॉ. कलाम यांचे जीवन प्रशिक्षणार्थ्यांसाठी आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांच्या जीवनात संघर्ष, ज्ञानाची आवड, शिस्त व देशसेवेची भावना यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
गटनिदेशक साहेबराव हेंबाडे यांनी डाॅ. कलाम यांच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले की, केवळ मोठी स्वप्ने पाहून थांबू नये, तर ती प्रत्यक्षात साकार करण्यासाठी कठोर परिश्रम, सातत्य व आत्मविश्वासाची जोड द्यावी. डॉ. कलाम यांचे जीवन हे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाची शिखरे गाठण्याचे जिवंत उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थ्यांसाठी विविध साहित्यातील पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले होते.
गटनिदेशक उमेश पालवे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला निदेशक आनंद जाधव, मधुकर वाघेरे, मधुकर सानप, संदीप काजळे, गोकुळ बेदाडे, मोहन पवार, योगेश गांगोडे, अजय पवार, सुशील लोहकरे, अमोल नागरे आदी कर्मचारी उपस्थित होते.
—