रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनच्या ‘ओसीव्ही’त जम्मू – काश्मीरच्या पाहुण्यांचा स्नेहसन्मान

प्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांच्याकडून कार्याचा गौरव

0

नाशिक : प्रतिनिधी
“रोटरीची मैत्री आणि सेवाभाव हा कोणत्याही भौगोलिक सीमांमध्ये बांधलेला नसून तो थेट हृदयाशी जोडणारा रेशीमबंध आहे,” याची प्रचिती रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिकृत क्लब भेटीत आली. रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात झाला. या कौटुंबिक स्नेहमेळाव्यात ‘रोटरी फ्रेंडशिप एक्सचेंज’ उपक्रमांतर्गत थेट जम्मू-काश्मीर येथून नाशिक भेटीवर आलेल्या पाहुण्यांना करोली स्वीट्स बँक्वेट हॉल येथे आमंत्रित करून त्यांचा आदरसत्कार करण्यात आला. ज्यामुळे या सोहळ्याला राष्ट्रीय एकात्मतेचे आणि आंतर-प्रांतीय स्नेहाचे देखणे कोंदण लाभले.
जम्मू टीमने क्लबचे सदस्य यांनी रोटरी क्लब नाशिक मिडटाऊनचे अध्यक्ष दिपक धोळकिया व क्लबचे सदस्य यांचे आभार मानताना, “रोटरीच्या या आतिथ्याने आणि प्रेमाने आमची मने जिंकली असून ही सुंदर फेलोशिप आम्ही कधीही विसरणार नाही,” अशी भावूक कृतज्ञता व्यक्त केली.

तत्पूर्वी, प्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांनी अध्यक्ष, सचिव व संचालक मंडळासोबत झालेल्या बैठकीत क्लबच्या कामकाजाचा बारकाईने आढावा घेतला. क्लबने संपूर्ण रेकॉर्ड  डिजिटल स्वरूपात सादर करून पर्यावरणपूरक ‘पेपरलेस ओसीव्ही’ केल्याबद्दल त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. तसेच  क्लबद्वारे सिन्नर येथील जिल्हा परिषद शाळा व  नाळेगाव आश्रमशाळेत शेवगा व देशी-फळझाडांचे २५० रोपांची लागवड करणे, १ हजार शेवगा रोपांचे यशस्वी वाटप, त्याच प्रमाणे वारे येथील आश्रमशाळेसाठी ८५ लाकडी बेंचेस उपलब्ध करून देऊन अंबोली येथे आनंदी शाळा निर्माण करणे, यासारख्या राबविण्यात येणाऱ्या सामाजिक प्रकल्पांची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
​सोहळ्यात दोन महा प्रकल्पांच्या प्रमुख दात्यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच क्लबच्या मासिक बुलेटिन स्नेहबंधनचे प्रकाशन झाले.
सचिव राजेंद्र वर्मा यांनी क्लबने पूर्ण केलेल्या १३ लोकोपयोगी प्रकल्पांची माहिती दिली, तर अध्यक्ष दिपक धोळकिया यांनी महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्य या त्रिसूत्रीवर आगामी वर्षात लक्ष केंद्रित करणार असल्याचा संकल्प मांडला.
​रोटरी नाशिक मिडटाऊन क्लबचे ध्येय, समाजोपयोगी सेवा प्रकल्प आणि सभासदांचा उत्साह वाखाणण्याजोगा असून तुमच्या टीममध्ये रोटरीचा खरा आत्मा प्रतिबिंबित होतो, अशा शब्दांत प्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांनी क्लबच्या कार्याची पाठ थोपटली.
—

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.