नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने महानुभाव पंथाचे संस्थापक व मराठी भाषेचे आद्य प्रणेते भगवान श्री चक्रधर स्वामी यांचा ५८ वा अवतार दिन (जयंती) उत्सव व पुरस्कार प्रदान सोहळा शनिवारी ( दि . १२ ) खंबाळे (ता. त्र्यंबकेश्वर) येथील श्री चक्रधर मंदिर व मोरे बँकवेट हॉल येथे धार्मिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.
या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील संत, महंत, अभ्यासक व मान्यवरांच्या उपस्थितीत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी ६ ते ७.३० वा. देवास मंगल स्नान, श्रीभगवद् गीता पाठ व पारायण संपन्न झाले, त्यानंतर सकाळी ९ वा.: ध्वजारोहण लेखक महंत सुरेशराज राहेरकर (तरडगाव, जि. सातारा) यांच्या हस्ते झाले. सभामंडप उद्घाटन महंत नागराजबाबा शास्त्री (छ. संभाजीनगर) यांच्या हस्ते झाले. त्यानंतर धर्मसभा व व्याख्यानसत्र संपन्न झाले.
सभाध्यक्षस्थानी अ. भा. महानुभाव परिषदेचे कार्याध्यक्ष उपाध्य कुलाचार्य, आचार्यप्रवर महंत वर्धनस्थ बीडकर बाबा होते , प्रमुख व्याख्याते साहित्याचार्य महंत संतोषमुनी शास्त्री कपाटे (छ. संभाजीनगर) यांनी सांगितले की , सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी अहिंसेंचा विचार दिला. त्यांच्या तत्वज्ञानाने आचरण केल्यास सर्व समाजाचे दुःख दूर होईल. तर संशोधक व लेखक महंत सुरेशराज राहेरकर (तरडगाव, जि. सातारा) यांनीही पंडित म्हाईंभट आणि नागदेवाचार्य यांच्या महानुभाव पंथातील कार्याबद्दल तसेच मराठी भाषेच्या योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली. तपस्विनी महंत आत्याबाईजी यांनीही यावेळी नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने गेल्या ५८ वर्षापासून निरंतर सुरू असलेल्या भगवान श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव सोहळ्याबद्दल संयोजकांचे कौतुक केले. सत्कारमूर्ती वैरागी बाबा यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भगवान श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव हा एक दिवसाऐवजी आठवडाभर किंवा पंधरा दिवस साजरा करण्याची करण्याचे आवाहन केले. आमदार हिरामण खोसकर , त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी व्यासपीठावर चक्रपाणी बाबा कोठी, महंत दामोदर बाबा, संतराज बाबा, भीष्मराज बाबा, अचलपूरकर बाबा, डोळसकर बाबा शास्त्री, मानसशास्त्री आदींसह संत – महंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपीराज शास्त्री सुकेणेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले. आभार प्रदर्शन अर्जुनराज सुकेणेकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रारंभी संत महंत आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. दरम्यान दुपारी १२ वा. देवास वीडाअवसर अर्पण करून महापूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यास दत्ताजी गायकवाड , डॉ. किरण देशमुख, प्राचार्य राजेंद्र निकम, शशिकांत भोजने, निवृत्ती लांबे, संपतराव चव्हाण, गणेश चव्हाण, दिनकर मोरे, भाऊसाहेब मोरे, सोमनाथ खांडबहाले, शंकर खांडबहाले, दौलतराव मोरे, पंडितराव पागोरे, बाळासाहेब टर्ले, प्रा.बाळकृष्ण अंजनगावकर, लालजी पागोरे, अर्जुनराज सुकेणेकर, बाळकृष्ण सुकेणेकर, गोपीराजशास्त्री सुकेणेकर, गोविंदराज अंकुळनेरकर, राजधरदादा सुकेणेकर यांच्यासह लोकप्रतिनिधींसह पंथातील विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.
या सोहळ्यामध्ये अमरावती जिल्हा ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाचे अध्यक्ष त्यागमुर्ती विनयमुनी पंजाबी उर्फ वैरागी बाबा (यांना समाजोपयोगी व पंथाच्या उल्लेखनीय सेवेबद्दल ‘आचार्य महंत सुकेणेकर बाबा शास्त्री कार्यगौरव पुरस्कार २०२५-२६’ हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी आचार्य महंत सुकेणेकर बाबा शास्त्री जिल्हास्तरीय कार्य गौरव पुरस्कार हा ओणे (ता . निफाड) येथील सुकदेव केदार यांना प्रदान करण्यात आला. या दोन्ही पुरस्काराचे स्वरूप मानपत्र मानचिन्ह असे होते.
दरम्यान शुक्रवारी (दि. ११ ) दुपारी ४ वा. श्री मुर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात श्री चक्रधर गोप मंडळ खेरवाडी, तसेच संत महंत, मंगल वाद्य सहभागी झाले होते. श्री चक्रधर मंदिर खंबाळे, मोरे हॉल येथे ही मिरवणूकीचा समारोप झाला. रात्री ८ वाजता अचलपूरकर बाबा यांचे जाहीर कीर्तन झाले. यावेळी खंबाळे, जिव्हाळे, अंजनेरी, गोंदे, दलपतपूर, सुकेणे, धाडोसी येथील भजनी मंडळी सहभागी झाले होते.
—