“सेवेच्या पलीकडे, विश्वासाचे नाते”

— नमस्ते नाशिक फाउंडेशनचा सप्रेवाडी, इगतपुरीत सामाजिक उपक्रम

0

नाशिक  : प्रतिनिधी
बदल फक्त तेव्हाच होऊ नये जेव्हा आपण एखाद्याला गमावण्याच्या उंबरठ्यावर असतो. खरं प्रेम शेवटच्या क्षणी दिलेल्या वचनात नसून ते रोजच्या छोट्या कृतींमधून दिसते, या स्तुत्य भावनेतून नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून सप्रेवाडी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक या छोट्याशा गावात सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत कुपोषित बालकाच्या कुटुंबाला संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच  गावातील रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांना आणि  शाळेत जाणाऱ्या मुलींना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी  स्कार्फचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान सी.ए. लीना नहार, सीए राहुल नहार यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना आणि त्यांच्या मुलींच्या, तसेच पुढील पिढीच्या शिक्षणाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. याचबरोबर पुढील पिढीच्या शिक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गावातील महिलांनी सी.ए. लीना नहार, वर्षा  बंब  यांना आश्वासन दिले की, येत्या काळात आमच्या गावातून किमान एक तरी चार्टर्ड अकाउंटंट घडविण्याचा संकल्प आम्ही पूर्ण करू. अध्यक्ष स्नेहल देव यांनी कष्टकरी महिलांना मार्गदर्शन करताना आपल्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. उन्हात काम करताना स्वतःचे संरक्षण कसे करावे, शरीरात आवश्यक असणारी पाण्याची गरज, तसेच भविष्यात गावात एकही कुपोषित बालक जन्माला येऊ नये यासाठी महिलांनी स्वतःची तब्येत कशी सुदृढ ठेवावी याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
याशिवाय, पौष्टिक आहाराचे महत्त्व, फळांचे नियमित सेवन आणि त्याचा आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम याबाबतही त्यांनी उपस्थित महिलांना माहिती दिली. या उपक्रमामुळे गावात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी याबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण झाली असून, नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.