भगवदगीता : यशस्वी जीवनासाठी दिव्य अमृत (गीता जयंती विशेष)       

0
इतर सर्व धर्मांचा (कर्तव्यांचा) त्याग करून केवळ माझेच स्मरण कर; मी तुला (ती कमी महत्वाची कर्तव्ये न केल्यामुळे जमा होणाऱ्या) सर्व पापांपासून मुक्त करीन. तू शोक करू नकोस! गीता अध्याय 18 : श्लोक 66.
  “ईश्वर अर्जुन संवाद” या श्री श्री परमहंस योगानंदजी यांच्या ग्रंथात महर्षी व्यासांच्या भगवद्गीतेचा विस्तृत अनुवाद आणि त्यावरील भाष्य आहे. भगवान कृष्णाने त्याचा आदर्श शिष्य अर्जुन याला दिलेल्या वचनाचा त्या महान योग्यांनी असा अनुवाद केला आहे; “जर तू माझ्या निर्देशानुसार सर्व दैवी कर्तव्ये पार पाडत, सर्व अहंकारप्रेरित कर्तव्यांचा त्याग करत, माझ्यामध्ये ब्रम्हानंदात युक्त राहशील, तर तुला मुक्तीचा लाभ होईल.”
 “योगी कथामृत” ह्या अभिजात आध्यात्मिक पुस्तकाचे लेखक आणि शंभर वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वी योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया/सेल्फ-रीअलाईझेशन फेलोशिपची संस्थापना करणारे योगानंदजी स्पष्ट करतात की, विश्वाचे संपूर्ण ज्ञान गीतेच्या अवघ्या 700 श्लोकांमध्ये समाविष्ट आहे, आणि “जिथे कुठे कोणी साधक ईश्वरप्राप्तीच्या पंथावर वाटचाल करत असेल, तिथे गीता प्रवासाचा तो भाग प्रकाशमान करेल.”
  श्रीकृष्णाने गीतेमध्ये दोन वेळा उल्लेख केलेल्या क्रियायोग या पवित्र साधनेचे पुनरुज्जीवन करणारे परमगुरू श्री श्री लाहिरी महाशय आणि महावतार बाबाजी यांच्यापासून प्रेरणा घेऊन योगानंदांनी अनेक वर्षांपूर्वीच त्यांचे गीता भाष्यावरील कार्य स्वामी श्रीयुक्तेश्वर गिरी या त्यांच्या गुरूंच्या अंत:प्रेरित मार्गदर्शनाखाली सुरू केले होते. योगानंदजी असे विशद करतात की, “अंतःस्फूर्त आकलनाचा अडकित्ता वापरून धर्मग्रंथातील वचनांवर असणारे भाषेचे आणि संदिग्धतेचे कवच कसे उघडायचे आणि आतमधील सत्यरूपी गाभ्यापर्यंत कसे पोहोचायचे, ते साधक आत्मसाक्षात्कारी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिकतो.”
गीतेतील सखोल तात्त्विक संकल्पनांचे अंतिम पुनरावलोकन आणि तपशीलवार मांडणीचे कार्य, गुरुजींच्या 1952 मधील महासमाधीच्या आधीच्या काही महिन्यांत कॅलिफोर्नियातील मोहावि वाळवंटातील एका छोट्याशा आश्रमात एकांतात करण्यात आले होते. “जेथे योगानंदजी काम करीत होते, त्या खोलीतील स्पंदन अविश्वसनीय होते; ईश्वराचे अस्तित्व तेथे स्पष्टपणे जाणवत होते.” अशी एका संन्याशाची आठवण आहे.
  योगानंदजींचा हा अद्वितीय प्रयास केवळ त्यांच्या स्वत:च्या संकल्पनेनुसार किंवा बुद्धीच्या कसरतीद्वारे गीता समजून घेणे आणि समजावून सांगणे एवढ्यापुरता मर्यादित नव्हता, तर श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील प्रत्यक्ष संवाद महर्षी व्यासांनी जसा अनुभवला आणि आध्यात्मिक परमानंदाच्या विविध अवस्थांमध्ये योगानंदांना जसा उलगडून सांगितला, तो जगापुढे मांडणे इथपर्यंत त्याचा विस्तार होता.
  अशा प्रकारे, “ईश्वर अर्जुन संवाद” ह्या ग्रंथात सर्वव्यापी परमात्मा (ज्याचे प्रतीक श्रीकृष्ण आहे) आणि आदर्श साधकाचा आत्मा (ज्याचे प्रतिनिधित्व अर्जुन करतो) यांच्यातील संवादाचे वर्णन केले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्याशी (पांडूचे कुळ) जोडलेली शुध्द विवेकबुद्धी आणि अहंकाराच्या भ्रमाखाली असलेले इंद्रिय-बद्ध अंध मन (आंधळा राजा धृतराष्ट्र आणि त्याची दुष्ट संतती) यांच्यामध्ये चाललेली आध्यात्मिक आणि मानसिक लढाई स्पष्ट करण्यासाठी कुरुक्षेत्रावर झालेल्या युद्धाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा उपयोग केलेला आहे, हे पहिल्या अध्यायातच विवेकी विद्यार्थ्याच्या स्पष्टपणे लक्षात येते.
  अहंकार आणि त्याच्या दुष्ट मानसिक प्रवृत्तींच्या सैन्याकडून आपले राज्य पुनः मिळवण्यासाठी आणि आत्म्याचे सार्वभौमित्व स्थापित करण्यासाठी; कृष्णाच्या (गुरू किंवा जागृत आत्मबोध किंवा ध्यानातून उद्भवलेली अंत:स्फूर्ती) मदतीने हे युद्ध ऐहिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर लढलेच पाहिजे. ज्याप्रमाणे कृष्णाने निराश झालेल्या अर्जुनाचे दृढपणे सांत्वन केले, त्याचप्रमाणे योगानंदजी प्रत्येक प्रामाणिक साधकातील अर्जुनाला त्यांच्या अवर्णनीय शब्दांत उपदेश करतात: “प्रत्येक मनुष्याने स्वत:ची कुरुक्षेत्रावरील लढाई स्वत:च लढायची आहे. हे युध्द जिंकण्यासाठीच आहे; एवढेच नाही तर ते विश्वातील दैवी योजनेनुसार, तसेच आत्मा आणि ईश्वर यांच्यामधील शाश्वत नातेसंबंधाला अनुसरून आहे. हे आता नाही तर नंतर, कधी ना कधी जिंकण्यासाठीच आहे. “ईश्वर अर्जुन संवाद” आणि क्रियायोग याविषयी अधिक माहितीसाठी पहा: yssofindia.org
लेखिका: संध्या एस. नायर.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.