नाशिक : प्रतिनिधी
लोकशाही ही केवळ एक शासनपद्धती नसून ती नागरिकांच्या विकासाचा जीवनमार्ग होय. लोकशाही ही स्वातंत्र्य, समता, बंधुता, हक्क आणि न्याय या मूल्यांच्या पायावर उभी असते. व्यक्ती – व्यक्तीमधील आणि देशादेशातील प्रश्न शांततामय मार्गांने सोडविण्याचा लोकशाही हाच एकमेव मार्ग होय. म्हणून जगभरात लोकशाही हा शासन प्रकार बहुतांश देशांनी स्वीकारला आहे. भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे. आपल्या देशात लोकशाही अत्यंत सक्षमपणे रुजली गेली आहे. लोकशाहीत अंतिम सत्ता ही जनतेकडे असते. जनता निवडणुकांच्या माध्यमातून आपले प्रतिनिधी निवडतात आणि प्रतिनिधी जनतेच्यावतीने शासन कारभार चालवतात. यशस्वी लोकशाहीसाठी कायदेमंडळ, कार्यकारीमंडळ, न्यायमंडळ आणि प्रसारमाध्यमे यांचे कार्य नि:पक्ष आणि जबादारीपूर्ण पाहिजे, असे मत प्राचार्य डॉ. विनायक काळे यांनी व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, प्रा. डॉ. सुसान लॉरेन्सिया, प्रा. ज्ञानेश्वर मोगल, प्रा. चित्रा कापसे, प्रा. सारिका दौंड, प्रा. गोकुळ सानप आदी उपस्थित होते. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्यावतीने (१५ सप्टेंबर) जागतिक लोकशाही दिननिमित्त आयोजित निबंध स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
प्राचार्य डॉ. काळे म्हणाले की, पुढील अनेक शतके समाज सक्षमपणे घडविण्याची ताकद लोकशाही शासन प्रकारात आहे. ती समर्थपणे समाजात रुजली पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांनी लोकशाही विषयक जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी कार्यक्रमाचा उदेश स्पष्ट केला. लोकशाही शासन पद्धतीचा विकास सांगून लोकशाहीपुढील आव्हाने आणि सोडविण्याचे मार्ग विशद केले. प्रा. ज्ञानेश्वर मोगल यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. सुसान लॉरेन्सिया यांनी आभार मानले
—