नाशिक : प्रतिनिधी
१९ ऑगस्ट हा मराठा विद्याप्रसारक समाज, नाशिक या संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिन. हा दिवस मराठा विद्याप्रसारक संस्था सन १९८२ पासून ‘समाज दिन’म्हणून मोठ्या दिमाखात व भावपूर्ण वातावरणात साजरा करते. या दिनानिमित्त कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर गणपत दादा मोरे, कर्मवीर दत्तात्रय भोसले, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर ॲड. अण्णासाहेब मुरकुटे, कर्मवीर ॲड. बाबूराव ठाकरे, कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे, कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्यासह सर्व आद्य संस्थापकांच्या, कर्मवीरांचे कार्याच्या इतिहासाचा जागर केला जातो. कर्मवीरांचे कार्य केवळ नाशिक जिल्ह्याच्या सीमेपुरते मर्यादित नसून हा महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक चळवळीचा प्रेरणादायी इतिहास आहे. कर्मवीरांनी केलेल्या संघर्षाचा, कार्याचा, वैचारिक कामगिरींचा इतिहास सर्वांना कळावा, त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य, समाज प्रबोधन, लेखन, त्यांचे योगदान समजण्यासाठी अनेक महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीप्रमाणे कर्मवीरांचे जयंती – पुण्यतिथी शासन स्तरावर साजरी व्हावी, असे मत प्रा. डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालय विकास समिती सदस्य, नाशिक जिल्हा बार कौन्सिल माजी अध्यक्ष ॲड. भास्करराव पवार, रामदास मुरकुटे, सहदेव जामदार, अशोक कोतवाल, शिवाजी शिरसाठ, ॲड. रामचंद्र आहेर, सुनील थेटे, नीता आहेर, चंद्रकला पाटील, प्राचार्या डॉ. संगीता तिडके, प्राचार्या कोमल शिंदे, प्रा. डॉ. किरण खैरनार, ग्रंथपाल विश्वास मोरे आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. ज्ञानोबा ढगे म्हणाले की, मराठा विद्याप्रसारक समाज संस्था ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या विचार आणि कार्याचा वारसा चालविणारी संस्था आहे. १९१४ पासून गेल्या ११२ वर्षात महाराष्ट्राच्या जडणघडणीत या संस्थेचा मोठा वाटा राहिला आहे. संस्थेत शिकून अनेक विद्यार्थ्यांनी जगभर नावलौकिक प्राप्त केला आहे. मराठा विद्याप्रसारक समाज संस्था खेडोपाडी, वाडी वस्त्यांवर सर्वांसाठी गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचे काम काम करीत आहे. संस्थेला ह्या कामासाठी मदत करणे ही समाजातील सर्वच दानशूर, समाजशील घटकांची जबाबदारी आहे, असेही डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. भास्करराव पवार म्हणाले की, बहुजन हिताय बहुजन सुखाय, हे ध्येय घेऊन संस्था कार्यरत आहे. काळाची गती ओळखून संस्था नव – नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम राबवित आहे. ही बाब गौरवास्पद आहे. संस्थेतील शिक्षकांनी संस्थेचे ब्रँड ॲम्बेसिएटर म्हणून कार्य करावे.
प्राचार्या डॉ संगीता तिडके यांनी प्रास्ताविकात संस्थेचा इतिहास, मविप्र समाज दिन साजरा करण्यामागील उद्देश सांगून कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.
सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते मविप्र ध्वजारोहण करून कर्मवीरांना अभिवादन करण्यात आले. समाजगीताने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. प्रा. डॉ. किरण खैरनार, विद्यार्थी भागवत पगार, वृषाली बुणगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. कैलास खोंडे यांनी केले. प्रा. नेहा पाटील यांनी आभार मानले. यावेळी बी.एड, डी.एड, एम.एड वर्गाचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
—