“पदभार स्वीकारण्यापूर्वीच जनसेवा! नगरसेवक प्रवीण जाधव यांनी जपली सामाजिक बांधिलकी”

0

नाशिक | विशेष प्रतिनिधी
शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या ‘लाल वादळात’ नाशिकच्या आदरातिथ्याचे अनोखे दर्शन घडले. रविवारी (२५ जानेवारी २०२६) सकाळी, हजारो आदिवासी बांधव म्हसरूळ परिसरातून मुंबईकडे मार्गस्थ झाले. मात्र, त्यापूर्वी शनिवारी रात्री व रविवारी सकाळी नाशिकच्या प्रवेशद्वारावर या कष्टकऱ्यांसाठी नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण जाधव माणुसकीचा आधार बनून उभे ठाकले.

शनिवारी सायंकाळी हजारो मोर्चेकरी म्हसरूळ हद्दीतील आरोग्य विज्ञान विद्यापीठासमोरील वनविभागाच्या उघड्या मैदानात मुक्कामासाठी दाखल झाले. कडाक्याची थंडी, त्यातच वीज आणि पाण्याचा अभाव अशा परिस्थितीत हे बांधव उघड्यावर दगड मांडून चूल पेटवत होते. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेताच म्हसरूळ प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक प्रवीण जाधव यांनी तत्परतेने मदतकार्य सुरू केले. त्यांनी तातडीने अनेक टँकर्सद्वारे मुक्कामाच्या ठिकाणी पाणीपुरवठा केला आणि रात्री अंधार दूर करण्यासाठी विजेची तात्पुरती व्यवस्था केली.
विशेष म्हणजे, आज रविवारी (दि. २५) सकाळी या हजारो श्रमजीवी बांधवांना नगरसेवक जाधव यांच्या वतीने गरमागरम खिचडी-भाताचा नाश्ता देण्यात आला. तृप्त मनाने आणि घोषणांच्या गजरात हा मोर्चा नाशिक शहरातून मार्गस्थ झाला. यावेळी आरटीओ कॉर्नर आणि गोरक्षनगर येथे मोर्चातील नेत्यांचा सत्कारही करण्यात आला. हा ‘लाल वादळ’ मोर्चा आता आपल्या मागण्यांसाठी मुंबईकडे कूच करत आहे.

निस्वार्थ कामाचा आम्हाला सार्थ अभिमान
अद्याप लोकप्रतिनिधी म्हणून अधिकृत कार्यभार हाती घेतलेला नसतानाही, जाधव यांनी दाखवलेल्या या सामाजिक दातृत्वाचे सर्वत्र कौतुक आहे. राजकारण आणि समाजकारणाचा सुवर्णमध्य साधत केलेल्या या निस्वार्थ कामाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

अपूर्व शास्त्री, स्थानिक नागरिक

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.