नाशिक : प्रतिनिधी
पंचवटी परिसरात गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत जनविश्वास संपादन करणारे प्रवीण जाधव अखेर महापालिकेत पोहोचले आहेत. महापालिका निवडणुकीत मतदारांनी त्यांच्या रूपाने निरपेक्ष सामाजिक व्यक्तिमत्वाला भाजपाच्या लाटेतही पसंती दिली.
नाशिकसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा लागला, तर नव्या आणि कार्यकर्तृत्व सिद्ध केलेल्या उमेदवारांना मतदारांनी संधी दिली. त्यामध्ये शिवसेना (शिंदे गट) उमेदवार प्रवीण जाधव यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.
सुशिक्षित, अभ्यासू आणि विकासाभिमुख उमेदवार म्हणून ओळख असलेल्या जाधव यांच्यावर प्रभाग क्रमांक १ मधील मतदारांनी विश्वास टाकला आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचा ठाम विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे.
गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळाच्या माध्यमातून प्रवीण जाधव यांनी गेल्या विविध सामाजिक उपक्रम राबवले. प्रभागातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरांचा लाभ लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी घेतला. यासोबतच उन्हाळ्यात मोफत पाणी टँकरचे वाटप करून नागरिकांना दिलासा देण्यात आला.
गुढीपाडव्यानिमित्त आयोजित भव्य शोभायात्रा नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. तसेच ‘सांजपाडवा’ हा पंचवटीतील सांस्कृतिक उपक्रम नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. शिक्षक गौरव सोहळा, स्वच्छता अभियान तसेच इतर अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आले.
आदर्श प्रभाग घडवण्यासाठी सर्वांना सोबत घेणार
लोकप्रतिनिधी नव्हतो तेव्हाही निरपेक्ष भावनेने केलेले कार्य आजही पुढे सुरूच ठेवणार आहे. “सांस्कृतिक व सामाजिक कार्याचा वसा कायम ठेवत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार आहे. आदर्श प्रभाग घडवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन महापालिका सभागृहात प्रश्न मांडणार आहे.”

– प्रवीण जाधव, नगरसेवक, प्रभाग क्रमांक १
—