म्हसरूळमध्ये परिवर्तनाचे वारे; ‘विकासासाठी एकत्र या’, शिवसेना उमेदवारांचे मतदारांना आवाहन

0

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाचा दिवस जवळ येत चालला आहे. त्यामुळे प्रचाराचा धुरळा चांगलाच उडू लागला आहे. प्रभाग क्रमांक १ (म्हसरूळ) मध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांनी या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद झोकून दिली आहे. ‘आता बोलायचे नाही, तर परिवर्तन करून दाखवायचे’ असा ठाम निर्धार व्यक्त करत शिवसेनेने विरोधकांविरुद्ध रणशिंग फुंकले आहे.
सोमवारी (दि. १२) प्रभाग १ मधील शिवसेनेचे उमेदवार नयना (करुणा) रामवंशी (१अ), गणेश चव्हाण (१ब), उर्मिला निरगुडे (१क) आणि प्रवीण जाधव (१ड) यांनी म्हसरूळ गाव आणि परिसराचा झंझावाती दौरा केला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निघालेल्या पदयात्रेमुळे परिसर भगवेमय झाला होता.
परिवर्तन घडवाच
प्रचार दौऱ्यादरम्यान उमेदवारांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. “गेल्या २५ वर्षांत महापालिकेत केवळ टक्केवारीचे राजकारण झाले. त्यामुळे विरोधकांनी काही सांगितले तरी ते ऐका, पण मतदान करताना मात्र परिवर्तनासाठी आणि विकासासाठीच करा,” असे आवाहन उमेदवारांनी केले.
विकासाची नवी पहाट
“गेल्या अनेक वर्षांपासून म्हसरूळ परिसरातील मूलभूत नागरी समस्या सुटलेल्या नाहीत. रस्ते, पाणी आणि कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांना दिलेले मत हे थेट विकासाला दिलेले मत असेल,” असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. ही निवडणूक म्हसरूळच्या प्रगतीची ‘नवी पहाट’ ठरेल, अशी आशाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रचार दौऱ्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. ठिकठिकाणी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले, ज्यामुळे शिवसेनेच्या (शिंदे गट) गोटात उत्साहाचे वातावरण आहे. आता या प्रचाराचे रूपांतर मतांमध्ये होऊन प्रभाग १ मध्ये परिवर्तन घडणार का, याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.