नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटीतील म्हसरूळ (प्रभाग क्रमांक १) येथे शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या शनिवारी (दि.१०) काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी कलाकारांनी आदिवासी नृत्य सादर केले. प्रत्येक ठिकाणी फटाके फोडून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी विविध परिसरातील नागरिकांनी समस्याचा पाढा वाचून दाखवला. लोकप्रतिनिधी येऊन समस्या ऐकून गेले. पण, समस्या दूर झाली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
शिवसेना (शिंदे) पक्षाने या प्रभागात नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१अ), गणेश चिंतामण चव्हाण (१ब), उर्मिला सुनिल निरगुडे (१क), प्रविण मंदाकिनी रमेश जाधव (१ड) यांसारख्या सुशिक्षित चेहऱ्यांना मैदानात उतरवले आहे.
प्रचार फेरी म्हसरूळ येथील आंबेडकरनगर, पवारवाडी, दत्त मंदिर, वाढणे कॉलनी, मोराडे वस्ती, जाधव वस्ती, गजपंथ नगर आदी भागांतून काढण्यात आली. या फेरीत पक्षाचा जयघोष करण्यात आला. आंबेडकरनगर येथे फटाके फोडून जल्लोष, तर पवारवाडी, दत्त मंदिर येथे महिलांनी उमेदवारांचे औक्षण केले. वाढणे कॉलनी येथे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
फेरीमध्ये सचिन साळुंखे, सागर नवले, अविनाश लोखंडे, शिवाजी शिंदे, राहुल जाधव, प्रवीण शिंदे, राजू खांदवे, राहुल सानप, अमृता अहिरे, रमेश सोनवणे, संदीप गांगोडे, प्रणव बाविस्कर, अनिकेत खेमणार, अमोल पाटील, सुशांत साळवे आदी सहभागी होते.
प्रभागात गेल्या अनेक वर्षांपासून तेच लोकप्रतिनिधी आहेत. पण, प्रभागाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. उद्यान, पाणी, रस्त्यांचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) यांनी चार सुशिक्षित उमेदवार दिले आहेत, त्यांना निवडून द्यावे व प्रभागाचा विकास करण्याची संधी द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.
नागरिकांनी सांगितले की, प्रभागातील आधीच्या नगरसेवकांकडे महत्त्वपूर्ण पदे होती, पण विकास झाला नाही. कमीत कमी दोन वेळेस पाणीपुरवठा व्हायला हवा. जलकुंभांची संख्या अधिक हवी. प्रश्न सोडविण्यासाठी बदल हवा. शिवसेनेचे हे उमेदवार हुशार व नेतृत्व करणारे आहे. त्यांना एक संधी दिली पाहिजे. ही काळाची गरज आहे. त्यांच्याकडे सत्ता नसतानाही लोकांची कामे केलेली आहे. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न नगरसेवकांपर्यंत पोहचतच नाही, तर काही उपयोग नाही, अशी खंतही नागरिकांनी व्यक्त केली.
ओहळाला कोट हवा
नागरिकांनी प्रचारफेरीत सांगितले की, जैन मंदिराजवळील वडनगर येथे ओहळाला कोट झाला पाहिजे. तेथे वर्षांतून एकदा स्वच्छता व्हायला हवी. पावसाळ्यात पाणी दारापर्यंत व परिसरातून वाहते. कोण कोणाचे भांडे आदी वस्तू वाहून गेल्या आहेत. पावसाळ्यात रात्री झोप लागत नाही. कारण, पाणी केव्हाही ओहळातून वर येऊ शकते. लोकप्रतिनिधी येऊन समस्या ऐकून गेले. पण, समस्या दूर झाली नाही. मागच्या वेळी नगरसेवकांना निवडून दिले, पण काम झाले नाही. आता पुढील नगरसेवकांना निवडून देऊ, पण त्यांनी कामे केली पाहिजे. जे काम करणार आहे, त्यांना आम्ही निवडूनच देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
—