नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिवसेना (शिंदे) पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचारात लक्ष वेधून घेतले आहे.
रस्ते, आरोग्य आणि पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी महिला आणि युवती यंदा शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असल्याचे चित्र रॅलीदरम्यान पाहायला मिळाले. ही निवडणूक आता केवळ उमेदवारांची नसून शिवसैनिकांच्या अस्मितेची लढत बनली आहे.
प्रविणभाऊ रमेश जाधव (१-ड), गणेशभाऊ चिंतामण चव्हाण (१-ब), उर्मिलाताई सुनिल निरगुडे (१-क) आणि नयनाताई रविंद्र रामवंशी (१-अ) यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने प्रभागातील मतदारांचे लक्ष वेधून घेतले.
कंसारा माता चौकापासून या रॅलीचा प्रारंभ झाला. प्रभातनगर, एकतानगर, सोहम मिसळ परिसर, संभाजीनगर, लगरे कॉलनी, केतकीनगर, आश्रमशाळा परिसर आणि म्हसरूळ या भागात उमेदवारांनी प्रत्यक्ष घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी ‘यंदा परिवर्तन घडवणारच’ असा ठाम निर्धार नागरिकांनी व्यक्त केला.
२५ वर्षांच्या सत्ताधाऱ्यांविरोधात संताप
गेल्या २५ वर्षांपासून प्रभाग १ मध्ये एकाच पक्षाची सत्ता आहे. मात्र, आजही रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि आरोग्याचे प्रश्न सुटलेले नाहीत. विकासापासून वंचित राहिलेल्या या प्रभागाची अवस्था पाहून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. मागील नगरसेवकांनी लोकोपयोगी कामे केली नसल्याने आता बदल हवा, अशी भावना मतदारांनी बोलून दाखवली.
कोणतीही सत्ता नसताना प्रविण जाधव यांनी स्वखर्चातून प्रभागात अनेक विकासकामे केली आहेत. त्यांनी अनेक कुटुंबांना दिलेला मदतीचा हात नागरिक विसरलेले नाहीत. “लोकप्रतिनिधी असावा तर प्रविण जाधव यांच्यासारखा,” अशा शब्दांत नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. जाधव व त्यांचे सहकारी प्रभागाचा कायापालट करतील, असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला.
‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रभाव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा मोठा प्रभाव महिला मतदारांमध्ये दिसून येत आहे. “मिळालेल्या आधाराची परतफेड करू,” अशी ग्वाही महिलांनी दिली.
—