नाशिक : प्रतिनिधी
वाचन ही केवळ ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया नसून व्यक्तिमत्त्व घडविणारे प्रभावी माध्यम आहे. समाजात वाचनाची आवड वाढविण्यासाठी आणि वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी सार्वजनिक वाचनालयांनी सातत्याने उपक्रम राबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.
सिंचन भवन परिसरातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक वाचनालयाच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या सोहळ्यात भावे यांनी ‘सांस्कृतिक महाराष्ट्र व वाचक चळवळ’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. वर्धापन दिनाचे औचित्य साधून वाचनालयातर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘उत्कृष्ट वाचक पुरस्कार’ यंदा सेवानिवृत्त अभियंते दयानंद बुकाणे यांना प्रदान करून गौरविण्यात आले. मान्यवरांचे स्वागत वाचनालयाचे संचालक इंजि. प्रविण गायकवाड, सचिव हेमंत पोतदार यांनी केले. सर्व पदाधिकारी व सभासदांनी परिश्रम घेतले.
या सोहळ्यास ‘कडा’चे अधीक्षक अभियंता व प्रशासक इंजि. राजेश गोर्धने, प्रादेशिक जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता इंजि. हरीभाऊ गिते, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे , वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी आदी मान्यवरांसह वाचनालयाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते