नाशिक : प्रतिनिधी
गणेशोत्सव म्हटला की बाजारातील महागडे डेकोरेशन आणि पीओपीच्या मूर्ती, पण तारवाला नगर, दिंडोरी रोड येथील घडवजे कुटुंबाने याला छेद देत गेली 15 ते 20 वर्षे एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. सप्तशृंगी अपार्टमेंट येथे राहणारे कचरू घडवजे हे स्वतःच्या हाताने कार्डबोर्डपासून भव्य मंदिरे बनवतात. यावर्षी त्यांनी वृंदावन येथील प्रसिद्ध प्रेम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. या मंदिराची उंची सुमारे पाच ते सहा फूट असून यासाठी फक्त टाकाऊ पुठ्ठा (कार्डबोर्ड), कागद आणि घरातील साहित्याचा वापर केला आहे.
विशेष म्हणजे ते दरवर्षी बाजारातून मूर्ती न आणता शाडू मातीपासून स्वतःच गणेश मूर्ती घडवतात. त्यामुळे विसर्जनानंतर नदीचे प्रदूषण होत नाही. बासरी वाजवणाऱ्या रूपातील यावर्षीची त्यांची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे परिसरात कौतुक होत असून, अनेक तरुणांना यातून प्रेरणा मिळत आहे.
श्रद्धेबरोबरच पर्यावरण जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. लहानपणापासून हाताने काहीतरी बनवायची आवड होती, त्यातूनच ही परंपरा सुरू झाली. आता परिवारही यात मदत करतो.
– कचरू घडवजे, दिंडोरीरोड
—