नाशिक : प्रतिनिधी
‘लहानपणापासून आपली आवड ओळखून त्याच दिशेने करिअरचे मार्गक्रमण केल्यास यश निश्चित मिळते, तसेच आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रित होते त्यामुळे बालपणासून आपली आवड जोपासा’ असे प्रतिपादन नाशिकचा युवा चित्रकार मयुरेश आढाव याने लंडन किड्स प्रीस्कूल आयोजित ‘नन्हे सितारे अन्युअल डे सिलिब्रेशन’ या वार्षिक स्नेहसंमेलनात केले. मयुरेश आढाव याला सदर स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. चित्रकलेतील जिद्द, सातत्य आणि प्रतिभेची दखल घेत मयुरेशला समारंभासाठी निमंत्रित करण्यात आले होते.
स्नेहसंमेलन कृष्णाई लॉन्स, छत्रपती संभाजीनगर रोड येथे नुकतेच उत्साहात झाले. ‘मिळालेला सन्मान हा माझ्यासाठी अत्यंत गौरवास्पद तसेच अविस्मरणीय असून हा कलेचा सन्मान आहे’ असे यावेळी मयुरेश अधिक बोलताना म्हणाला. कार्यक्रमावेळी व्यासपीठावर लंडन किड्स प्रीस्कूल अध्यक्ष तोष्णील बोरस्ते, संचालिका तथा प्राचार्य नम्रता बोरस्ते , अश्विनी अत्रे, राजेंद्र आढाव आणि रुपाली आढाव, उपप्राचार्य सारिका बलकवडे आदी उपस्थित होते.
या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या गायन, वादन, नृत्य या कला सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या कला सादरीकरणाला उपस्थितांची मोठी उपस्थिती आणि प्रतिसाद लाभला. कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मयुरेश आढाव याच्या चित्रांचे चित्रप्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी विविध उपक्रमांतील विजेत्यांना मयुरेश आढाव, अध्यक्ष तोष्णील बोरस्ते, नम्रता बोरस्ते,अश्विनी अत्रे यांच्या हस्ते पारितोषिके व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली.
नर्सरी शिक्षका चैताली बोरसे, केजी शिक्षिका रुपाली आंबेकर, प्रियंका चव्हाणके, माधुरी हांडगे, छाया एखंडे, प्रियंका उशीरे, तसेच लंडन किड्स प्रीस्कूलच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी कष्ट घेतले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालकवर्गाची उपस्थिती होती.
—
लंडन किड्स प्रीस्कूल, नाशिकचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
Get real time updates directly on you device, subscribe now.