नाशिक : प्रतिनिधी
विद्या सेवा संस्थेच्या आरटीओ कार्यालयाजवळील किशोर सूर्यवंशीरोडवर असलेल्या प्रणित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. परिसरात शालेय लेझीम पथकासह प्रभातफेरी काढण्यात आली. यात साक्षरता, व्यसनमुक्ती, वृक्ष संवर्धनाच्या संदेशपर घोषणा देण्यात आल्या. भारत माता की जय, प्रजासत्ताक दिनाचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. विद्यार्थ्यांची देशभक्तीपर गीतांवर सामुदायिक कवायत केली.
प्रमुख पाहुण्या म्हणून फॅशन डिझायनर व निवृत्त प्राचार्य प्रेरणा रैना, अभिनेते व दिग्दर्शक पंकज रैना उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या सेवा संस्थेच्या अध्यक्षा व प्रणित माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा पिंगळे होत्या. संस्थेचे संस्थापक सचिव व प्रणित प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश जी. पिंगळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विद्या सेवा संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. प्रणित पिंगळे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व देशभक्तीपर गीत सादर केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीसे, ऑलंपियाड परीक्षेचे सुवर्णपदक व प्रमाणपत्र देण्यात आले. नवभारत साक्षरता अभियानांतर्गत १०० टक्के साक्षर भारतासाठी शपथ घेण्यात आली.
यावेळी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. डी. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
—