क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या आयटीआयमध्ये आर्थिक साक्षरता कार्यक्रम संपन्न

0

नाशिक  : प्रतिनिधी
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या आयटीआयमध्ये भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) यांच्या पुढाकाराने आर्थिक साक्षरता कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य नितीन काळे होते.
प्रा. मकसूद मेमन यांनी सेबीच्या आर्थिक साक्षरता उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले. सेबी ही गुंतवणूकदारांचे हित जपणारी देशातील सर्वोच्च नियामक संस्था असून, नागरिकांमध्ये आर्थिक जागरूकता निर्माण करणे, सुरक्षित गुंतवणुकीची माहिती देणे, तसेच आर्थिक फसवणुकीपासून संरक्षण करणे हा तिचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मार्गदर्शनात बचतीचे महत्त्व, बँकिंग शिस्त, म्युच्युअल फंड, शेअर बाजाराची प्राथमिक माहिती, कमोडिटी मार्केट, दीर्घकालीन गुंतवणूक, डिजिटल व्यवहारातील सावधगिरी, तसेच बनावट योजना व आर्थिक फसवणूक ओळखण्याचे उपाय यावर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी ती सेबी नोंदणीकृत आहे की नाही याची खात्री करावी, असा महत्त्वाचा संदेश देण्यात आला.
प्राचार्य काळे यांनी, विद्यार्थ्यांनी कमावलेल्या उत्पन्नाचे योग्य नियोजन करावे, अनावश्यक जोखमी टाळाव्यात व आर्थिक निर्णय सुज्ञपणे घ्यावेत, असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या सक्षम व जागरूक नागरिक बनतील, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
याप्रसंगी गट निदेशक साहेबराव हेंबाडे, उमेश पालवे, निदेशक दीपक साळवे, मधुकर वाघेरे, मधुकर सानप, गोकुळ बेदाडे, मोहन पवार, अजय पवार, योगेश गांगोडे, सुशील लोहकरे, प्रतीक्षा बदादे, सोनाली खिराडी, भारती नागरे, राहुल सानप आदी कर्मचारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.