नाशिक : प्रतिनिधी
येथील अशोका एज्युकेशन्स फाउंडेशन संचलित अशोका सेंटर फॉर बिझनेस ॲण्ड कॉम्प्यूटर स्टडीज, चांदशी येथे दिल धडकने दो या संकल्पनेवर आधारित तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, आत्मविश्वास वाढवणे, तसेच व्यवस्थापन आणि नेतृत्व कौशल्यांचा विकास करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या सांस्कृतिक दिवसांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक दिवसासाठी ठरविण्यात आलेली वेगळी आणि नावीन्यपूर्ण संकल्पना. पहिल्या दिवशी दिल है हिंदुस्तानी या थीमअंतर्गत विद्यार्थ्यांनी भारतातील चारही दिशा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व राज्यांचे प्रतिनिधित्व प्रभावीपणे सादर केले. दक्षिण भारतातील सर्व राज्यांचे सादरीकरण बी.बी.ए. विभागातील विद्यार्थ्यांनी केले, उत्तर भारतातील राज्यांचे प्रतिनिधित्व बी.बी.ए. (सी.ए.) विभागाने केले. पूर्व भारतातील राज्यांची झलक बी.कॉम विभागातील विद्यार्थ्यांनी, तर पश्चिम भारतातील सर्व राज्यांचे सादरीकरण बी.एस्सी (सी.एस.) विभागातील विद्यार्थ्यांनी साकारले. पारंपरिक वेशभूषा, चाल-ढाल आणि सांस्कृतिक प्रतीकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भारताची विविधता आणि एकात्मता प्रभावीपणे मांडली.
दुसऱ्या दिवशी दिल का हुकूम या संकल्पनेत लाल आणि काळ्या रंगसंगतीत विद्यार्थ्यांनी रॅम्प वॉक, खेळ आणि विविध सादरीकरणांद्वारे आपला आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व सादर केले. तिसऱ्या दिवशी कही पे निगाहें, कही पे निशाना या थीमनुसार मिसमॅच ड्रेसिंगमध्ये विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, विनोदबुद्धी आणि कल्पकता पाहायला मिळाली.
या महोत्सवात अंताक्षरी, दिलवाले रनवे ले जाएंगे (रॅम्प वॉक), बॉलिवूड सीन गेम, विविध टास्क गेम्स, सुनो सुनो तो अपने दिल की हा हेडफोन गेम, तसेच जॅमिंग सेशन यांसारख्या मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः जॅमिंग सत्रात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनीही सहभाग घेत संपूर्ण वातावरण संगीतमय आणि आनंददायी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. ए. घोष, उपप्राचार्या डॉ. हर्षा पाटील, बी.बी.ए. शाखा विभागप्रमुख लोकेश सुराणा, बी.बी.ए.-सी.ए. शाखा विभागप्रमुख प्रतिमा जगळे, बी.एस्सी-सी.एस. शाखा विभागप्रमुख सोनाली इंगळे आणि बी.कॉम शाखा विभागप्रमुख डॉ. परमेश्वर बिरादर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन सांस्कृतिक प्रमुख तेजस्वी जगताप, रामेश्वरी हुल्लुले आणि प्रिया सिंह यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमासाठी विद्यार्थी समन्वयक म्हणून मौलिक गौडा यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अशोक कटारिया, व्यवस्थापकीय विश्वस्त आस्था कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला आणि प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांचे मार्गदर्शन लाभले.
—