कालचा विद्यार्थी, आजचा रक्षक! सेंट लॉरेन्सच्या माजी विद्यार्थ्याकडूनच शाळेत ध्वजवंदन; विंग कमांडर विपिन चौधरींचा सन्मान

0
नाशिक : प्रतिनिधी

अश्विननगर, सिडको येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे २००३–२००४ या शैक्षणिक वर्षातील विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या भारतीय सैन्यात कार्यरत असलेले कमांडर विपिन चौधरी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. आपल्या माजी विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजवंदन होणे ही विद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली. विद्यालयाचे विश्वस्त निवृत्त कर्नल विजयकुमार दत्ता, विद्यालयाच्या संस्थापिका सुमन दत्ता उपस्थित होते.

झेंडा गीत गाऊन ध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर कावेरी मुळाणे, ईशान हरसूले व आद्या काळे या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे सादर केली. पुढे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. ‘जयस्तुते जयस्तुते श्री महान मंगले’, ‘वतन की राह पे वतन के नौजवान’, ‘रंग दे बसंती’, ‘कंधो से मिलते हैं कंधे’ अशा देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण शालेय परिसर देशप्रेमाच्या भावनेने भारावून गेला.

यावेळी प्रमुख पाहुणे विंग कमांडर विपिन चौधरी यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून प्रेरणादायी भाषण केले. ध्येय निश्चित करा, वाचनाचे महत्त्व ओळखा, माणुसकी हाच एकमेव धर्म आहे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच सर्वांचा आदर करा, विशेषतः शिक्षकांचा. स्वतःवर प्रेम करा, अडथळे आले तरी खचू नका व पुढे जात राहा, असा मौल्यवान सल्ला त्यांनी दिला. तुमचा मार्ग तुम्ही स्वतः निवडा; तुम्ही नक्की जिंकाल, असा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला. शेवटी देशसेवेसाठी भारतीय सैन्याचे दरवाजे सदैव खुले असून, इच्छुक विद्यार्थ्यांचे सैन्यात स्वागतच आहे, असे त्यांनी आपल्या भाषणातून नमूद केले.
हा कार्यक्रम विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद तसेच मुख्याध्यापिका यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शालेय मैदानावर इयत्ता पाचवी ते १०वीचे विद्यार्थी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.