नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेली यशवंत व्यायाम शाळा या संस्थेने रविवारी (दि. १ मार्च) ११० वर्षांमध्ये पदार्पण केले आहे. यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक उपस्थित होते. अश्या संस्थांच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी सर्वांचे योगदान आवश्यक असल्याचे ढाॅ. गेडाम यांनी सांगितले.
यशवंत व्यायामशाळेची स्थापना १९१७ साली झाली आहे. या संस्थेच्यावतीने रविवारी (दि. १ मार्च) सायंकाळी ११० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी यशवंत व्यायामशाळेचे ज्येष्ठ्य सभासद, बलोपासक, प्रशिक्षक, खेळाडूंचे पालक, हितचिंतक आणि विविध क्रीडा संस्था, संघटना यांचे मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. गेडाम यांनी संस्थेच्या कार्याबद्दल कौतुक केले. त्यांनी सांगितले की, या संस्थेमध्ये खेळाडूंना घडवण्याचे उत्तम काम तर केले जातेच, परंतु त्याचबरोबर खेळाडूंवर जे संस्कार केले जातात ते खेळाडूंना आयुष्यभर कामी येतात. सक्षम नागरिक बनण्यासाठी हेच आवश्यक आहे. हे महत्वाचे काम यशवंत व्यायामशाळेच्या माध्यमातून केले जात आहे, ही अभिमानाची आणि आजच्या युगात महत्वाची बाब आहे असे सांगितले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नाईक यांनीही संस्थेच्या कार्याचा गौरव केला. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून संस्थेला आवश्यक सर्व बाबींचे सहकार्य केले जाईल, असेही सांगितले.
यावेळी मल्लखांब, ज्युदो आणि जिम्नॅस्टिक्स या खेळांची सुंदर प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. याचबरोबर यशवंत व्यायामशाळेचे कार्य आणि उत्तोरोत्तर प्रगतीसाठी कायमच नाशिकच्या दानशूर नागरिकांकडून भरघोस अश्या वस्तुरूपी आणि रोख स्वरूपात देणग्या मिळत आहेत. केवळ यामुळेच संस्था क्रीडा क्षेत्रात चांगली वाटचाल करत आहे. या मान्यवरांचे ऋण म्हणून त्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते गौरवण्यात आले. यामध्ये डॉ. प्रकाश जोशी, निशिकांत राजेबहाद्दर, डॉ. प्रतिभा धोपावकर, प्रदीप मोडक, उमेश राठी, अविनाश पाटील, प्रकाश देशमुख आदींचा समावेश होता. यावेळी जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक आबासाहेम घाडगे, डॉ. रत्नाकर पटवर्धन, जेष्ठ पत्रकार दीपक ओढेकर यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच यशवंत व्यायामशाळेच्या खेळाडूंनी विविध खेळांमध्ये राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांनाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी व्यायामशाळेच्या गेल्या ५०-६० वर्षाच्या विविध वाटचालीचा आढावा सादर केला आणि पुढील काळामध्ये खेळाडूंना आणखी चांगल्या सुविधा देता येतील यासाठी, संस्थेच्यावतीने आणखी काय करता येईल याचा आढावा घेतला. आनंद खरे यांनी आभार मानले. सीमा पेठकर – कर्पे यांनी सूत्रसंचालन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत व्यायामशाळेचे उपाध्यक्ष रघुनाथ महाबळ,संचालक डॉ. जयराम महाबळ, विजय खरोटे, डॉ. सदाशिव गोसावी, प्रशांत गायकवाड, प्रशिक्षक अविनाश खैरनार, संदीप शिंदे, विनायक दंडवते, योगेश शिंदे, स्वप्नील शिंदे, विजय पाटील, यशवंत जाधव आणि सहकारी यांनी परिश्रम घेतले.
—