नाशिक : प्रतिनिधी
येथील अशोका एज्युकेशन फाउंडेशन संचलित अशोका सेंटर फॉर बिझनेस ॲण्ड कॉम्प्यूटर स्टडीज, चांदशी येथील पुणे विद्यापीठ संलग्नित, नॅक प्रमाणित महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार समिती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहयोगाने ‘महिला सक्षमीकरण’ यावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचा उद्देश समाजामध्ये महिला सक्षमीकरणाबद्दल जागरूकता वाढवणे आणि प्रोत्साहन देणे हा होता.
कार्यशाळेसाठी प्रमुख अतिथी म्हणून इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या एसपीआय तृप्ती सोनवणे, सायबर सेलचे एपीआय प्रतीक पाटील आणि रिटायर्ड मेजर राजश्री लोखंडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. तृप्ती सोनवणे यांनी महिलांचे नियम आणि हक्क यावर भाष्य केले. त्यांनी भारतीय संस्कृतीत महिलांचे कार्य, भारतीय न्याय संहिता, विशाखा समितीचे कार्य, पॉक्सो कायदा याविषयी मार्गदर्शन केले.
प्रतीक पाटील यांनी सायबर सुरक्षेबद्दल माहिती दिली. त्यांनी शेअर बाजार, क्रिप्टो करन्सी, डिजिटल अरेस्ट, यूपीआय स्कॅम, इंटरनेट बँकिंग आणि ऑनलाइन शॉपिंग करताना कशी खबरदारी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.
राजश्री लोखंडे यांनी महिलांसाठी संरक्षण क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी माहिती दिली. संरक्षण क्षेत्रातील महिलांसाठी असणाऱ्या नवनवीन संधी आणि सरकारने संरक्षण क्षेत्रामध्ये घेतलेला पुढाकार याविषयी मार्गदर्शन केले.
विद्यार्थिनीचा प्रतिसाद
कार्यशाळेसाठी विद्यार्थिनीचा प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीबीए शाखेच्या विद्यार्थिनी विद्यार्थीनी वैष्णवी शिंदे आणि माही गौडा यांनी, तर आभार महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रतिनिधी अलिसा शेख हिने केले. कार्यक्रमाचे आयोजन अंतर्गत तक्रार समितीच्या प्रमुख प्रज्ञा डोंगरदिवे आणि वृषाली वाबळे यांनी केले.
कार्यशाळेसाठी यांचे मार्गदर्शन
संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक कटारिया, विश्वस्त आस्था कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. ए. घोष, उपप्राचार्या डॉ. हर्षा पाटील, बीबीए शाखा विभागप्रमुख लोकेश सुराणा, बीबीए-सीए शाखा विभागप्रमुख प्रतिमा जगळे, बीएस्सी-सीएस शाखा विभागप्रमुख सोनाली इंगळे आणि बी.कॉम शाखा विभागप्रमुख डॉ. परमेश्वर बिरादार यांचे कार्यशाळेसाठी मार्गदर्शन लाभले.
—