जिथे भगवान श्रीकृष्ण आहेत, विजय तिथेच आहे!

( श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष )

0
जन्माष्टमी हा सण, जो भगवान श्रीकृष्णांच्या या भूतलावरील अवतारदिनाची आठवण करून देतो, आपल्याला दरवर्षी आपले जीवन व प्रत्येक कृती भगवंताकडे पुन्हा अर्पण करण्याची प्रेरणा देतो. भगवान श्रीकृष्णांचा अमर संदेश आपल्याला भगवद्गीतेतून प्राप्त होतो: “तुझे मन माझ्यात एकरूप कर; माझा भक्त हो; सर्व काही मला अर्पण कर; माझ्या चरणी वंदन कर. तू मला प्रिय आहेस — म्हणून मी तुला खरेखुरे वचन देतो: तू मला निश्चित प्राप्त करू शकशील!” (ईश्वर-अर्जुन संवाद: श्रीमद्भगवद्गीता अध्याय : 18 श्लोक : 65).
म्हणूनच, जन्माष्टमीचा — तसेच भगवान विष्णूंचा महान अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या जीवनाचा — खरा अर्थ असा आहे की प्रत्येक मानवाने आपले जीवन आणि आपल्या सर्व कृतींचे फळ हे फक्त भगवंतालाच अर्पण करण्याची गरज ओळखली पाहिजे.
 “जिथे भगवान श्रीकृष्ण आहेत, तिथेच विजय आहे!” — भारतभूमीवर पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेले हे शाश्वत शब्द, जीवनाच्या प्रवासात आपल्यासमोर येणाऱ्या असंख्य परीक्षा व संकटांच्या काळातही, आपले मन सदैव भगवंतावर केंद्रित ठेवण्यासाठी आपल्याला प्रेरणा देतात.
जागतिक कीर्तिप्राप्त आध्यात्मिक पुस्तक “योगी कथामृत” चे लेखक श्री श्री  परमहंस योगानंद यांनी भगवद्गीतेवर दोन खंडांचा सखोल ग्रंथ “गॉड टॉक्स विथ अर्जुन”  लिहिला आहे. या अत्यंत आध्यात्मिक भाष्याच्या प्रस्तावनेत योगानंदजी म्हणतात, “भगवंताकडे परत जाण्याच्या मार्गावर कोणी कुठेही असो — भगवद्गीता त्या प्रवासाच्या त्या टप्प्यावर आपला प्रकाश टाकते.”
योगानंदजी आपल्या भाष्यात भगवद्गीतेच्या अंतर्निहित संदेशावर भर देतात — कुरुक्षेत्राच्या युद्धाचे आणि युद्ध आरंभण्यापूर्वीचे अर्जुनाच्या विषादाचे खरे महत्त्व म्हणजे प्रत्येक मानवाची आपली इच्छा आणि सवयी सोडण्याची अनिच्छा, तसेच धर्मयुद्ध लढण्याची टाळाटाळ; जे की शेवटी आत्म्याला मुक्ती देणारे असते.
महान धनुर्धर अर्जुनाने भगवद्गीतेत  भगवान श्रीकृष्णांना विनवणी केली आहे —
 “माझी अंतःप्रकृती दुर्बल सहानुभूती व करुणेने झाकोळली आहे; कर्तव्याबद्दल माझे मन संभ्रमात आहे. मी कोणता मार्ग स्वीकारावा हे तू मला सांग. मी तुझा शिष्य आहे; मी तुला शरण आलो आहे — मला शिकव.” (ईश्वर-अर्जुन संवाद: श्रीमद्भगवद्गीता  अध्याय : 02 श्लोक : 07)
यानंतर भगवान श्रीकृष्णांनी गीतेचा  अमर उपदेश दिला — जो स्वतः भगवंतांनी उच्चारल्यामुळे मानवतेला सर्वोच्च उन्नतीकडे नेणारा आहे, आणि ज्यातील प्रत्येक शब्द हा सांसारिक मोलाच्या पलीकडचा आहे. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ठामपणे सल्ला देतात —
 “योगी हा देहसंयम बाळगणाऱ्या तपस्व्यापेक्षा महान मानला जातो; ज्ञानमार्ग किंवा कर्ममार्ग यांचे अवलंबन करणाऱ्यांपेक्षाही  महान असतो. म्हणून, हे अर्जुना, तू योगी हो!” (ईश्वर-अर्जुन संवाद: श्रीमद्भगवद्गीता  अध्याय 6, श्लोक 46)
भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत  मानवजातीला ज्ञात असलेल्या सर्वोच्च आध्यात्मिक विज्ञानांपैकी एक — क्रियायोग — याचा दोन वेळा उल्लेख केला आहे. हाच क्रियायोग हा योगानंदजींच्याच्या शिकवणीचा केंद्रबिंदू आहे. त्यांना त्यांचे गुरू, स्वामी श्रीयुक्तेश्वर गिरी यांनी प्रशिक्षण दिले होते. स्वामी श्रीयुक्तेश्वर गिरी हे परमपूज्य योगावतार लाहिरी महाशयांचे शिष्य होते, आणि लाहिरी महाशय हे महावतार बाबाजी यांचे शिष्य होते.
योगानंदजींस्थापन केलेल्या योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया  (YSS) मार्फत, या महान गुरूंच्या शिकवणीचे प्रसारण मुद्रित व डिजिटल माध्यमातून केले जाते. YSS च्या ‘हाऊ टू लिव्ह’ (जीवन कसे जगावे) या पाठांचा या प्रक्रियेत महत्त्वाचा सहभाग आहे.
क्रियायोगा सारखा वैज्ञानिक मार्ग अवलंबून, कोणत्याही युगातील, कोणत्याही राष्ट्रीयतेतील व कोणत्याही पार्श्वभूमीतील सत्यशोधक व्यक्ती, आध्यात्मिक मुक्तीकडे — आणि शेवटी भगवंताशी एकत्व साधण्यात — प्रगती करू शकतात.
आणि हाच आहे जन्माष्टमीचा खरा संदेश — आपल्याला ठामपणे आठवण करून देतो की, आपल्यामध्ये प्रभूसोबत एकरूप होण्याची तीव्र तळमळ असली पाहिजे आणि आपला जीवनप्रवास त्या उद्दिष्टाकडे नेण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे.
अधिक माहिती : yssofindia.org
लेखक : विवेक अत्रे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.