सिद्ध योगविषयक ज्ञानाची आधुनिक मांडणी हवी : डाॅ. निलेश वाघ

0

नाशिक : प्रतिनिधी

प्राचीन ऋषींनी योगविषयक ज्ञान संशोधन करूनच मांडले आहे. ते सिद्धही केले आहे. पण, विविध कारणांनी या प्रक्रीया सविस्तर लिखीत नाही. सध्याच्या काळात कुठलेही ज्ञान आधुनिक विज्ञानाच्या कसोट्या वापरूनच सिद्ध करावे लागते. त्यामुळेच संशोधकांना या आधुनिक वैज्ञानिक कसोटयांवर योगविषयक ज्ञान सिद्ध करावे लागेल. जेणेकरून नव्या पिढीला चांगल्या प्रकारे पटवून देता येईल, असे प्रतिपादन योग महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. निलेश वाघ यांनी केले.

         योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या नाशिक जिल्हा समितीतर्फे योगशिक्षकांसाठीचे योगोत्सव 2024 हे जिल्हास्तरीय संमेलन नुकतेच झाले. याप्रसंगी योग एक संशोधनात्मक आव्हान, या विषयावर डाॅ. वाघ बोलत होते.
यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संचालक डॉ. जयदीप निकम, आयुर्वेदाचार्य सौरभ जोशी, संमेलनाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, संघाचे विभागीय अध्यक्ष व प्राचार्य यू. के. अहिरे, जिल्हाध्यक्ष जिवराम गावले, माजी संमेलनाध्यक्ष अशोक पाटील, पिराजी नरवाडे, डाॅ. तस्मिना शेख, डाॅ. विशाल जाधव, प्रा. प्र. द. कुलकर्णी, संध्या सोमय्या, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजय सोनवणे, रमेश धस आदी उपस्थित होते.
चिन्मय मिशन आश्रम, चिंचबन, मालेगाव स्टॅडजवळ, पंचवटी येथे हे संमेलन भरले होते. यात जिल्हाभरातून योगशिक्षक सहभागी होते. संघाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. मनोज निलपवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन झाले. याप्रसंगी आदर्श योगशिक्षक पुरस्कार मंदार भागवत व शर्मिला डोंगरे यांना देण्यात आला.
 डाॅ. निकम म्हणाले की, योगशिक्षक, योगविषयक संघटना यांनी परदेशी भाषांत योगशास्त्रविषयक अभ्यासक्रम तयार करावेत. त्यामुळे परदेशी नागरीक हे ज्ञान सहजपणे आत्मसात करू शकतील. या प्रक्रीयेत ज्ञान देण्याच्या समाधानासोबतच योगशिक्षकांसाठी अर्थार्जनही होईल. तसेच अशा अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठही सहकार्य करेल.
       योगशिक्षकांनी नोकरीपेक्षा स्वयंरोजगारावर भर द्यावा. त्यासाठी आपली जीवन कौशल्य वाढवावीत. तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. त्यामुळे आपण कुठूनही काम करू शकतो. संघटनेने यासाठी प्रयत्नशील राहावे व योगविषयक ज्ञान सर्वदूर पोहोचवावे. त्यातून आर्थिक स्त्रोतही उपलब्ध होईल, असेही डाॅ. निकम म्हणाले.
 वैद्य सौरभ जोशी यांचे यौगिक जीवनातील आहाराचे महत्व या विषयावर व्याख्यान झाले. यात त्यांनी निसर्गनियम व स्वतःच्या प्रकृतीनुसार आहारावर प्रतिपादन केले. संमेलनाध्यक्ष कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रायोजक, योगासन स्पर्धेतील परीक्षक व तांत्रिक अधिकारी यांचा सत्कार, तसेच योगासन स्पर्धेतील यशस्वितांचे बक्षीस वितरण झाले. प्रफुल्ल जोशी यांच्या योगाचे महत्व या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
  जिल्हाध्यक्ष गावले यांनी प्रास्ताविक केले. डाॅ. तस्मिना शेख यांनी शीर्षकगीत सादर केले. शर्मिला डोंगरे, डाॅ. अंजली भालेराव, गीता कुलकर्णी, किशोर भंडारी, वैशाली रामपूरकर, सीमा ठाकरे, डॉ. योगेश कुलकर्णी, भारती सोनवणे, शिवानी देशपांडे, हिराबाई अहिरे, अश्विनी येवला यांनी विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.