या अविस्मरणीय शब्दांद्वारे, स्वामी श्रीयुक्तेश्वरजींनी अधोरेखित केले की, एखाद्याला भविष्यात सकारात्मक बदल घडवून आणायचे असतील, तर आत्ताच आध्यात्मिक प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. आपले सर्वोत्तम प्रयत्न करण्याचे हे स्पष्ट आवाहन त्यांनी केले, कारण त्यांनी थोडक्यात पण स्पष्टपणे सांगितले: “ईश्वराचा शोध घेणे अर्थात, सर्व दु:खांचा अंत्यसंस्कार करणे.” किती हे गौरवशाली वचन: ईश्वराचा मागोवा घेताना लाभणारे सुखी आणि आनंदमय, दु:खमुक्त जीवन!
श्रीयुक्तेश्वरजींचा जन्म 10 मे 1855 रोजी पश्चिम बंगालमधील श्रीरामपूर येथे झाला. प्रियनाथ करार हे त्यांचे मूळ नाव. त्यांचे वडील एक श्रीमंत व्यापारी होते. बनारसचे महान संत, श्री लाहिरी महाशय यांच्या मार्गदशनाखाली, त्यांना “ज्ञानावतार” किंवा ज्ञानाचे मूर्त स्वरूप, ही सर्वोच्च पदवी प्राप्त झाली, आणि ते गिरी परंपरेतील स्वामी बनले.
अमर गुरूजी महावतार बाबाजी, यांनी तरुण मुकुंद लाल घोष, जे नंतर श्री श्री परमहंस योगानंद म्हणून ओळखले गेले, त्यांना पश्चिम बंगालमधील श्रीरामपूर येथील आध्यात्मिक प्रशिक्षणासाठी स्वामी श्रीयुक्तेश्वरजींकडे पाठविले. बनारस येथे रस्त्यावर श्रीयुक्तेश्वरजींना पहिल्यांदा भेटल्यावर, योगानंद्जींना लगेचच एक गूढ संबंध जाणवला. त्यांना उमजले की, अखेरीस त्यांना त्यांचे गुरू सापडले आहेत, ज्यांच्या दिव्य मुखाचे दर्शन ध्यानस्थ असताना त्यांना असंख्य वेळा झाले होते.
योगानंदजींना त्यांचे गुरू श्रीयुक्तेश्वरजींनी अशा रीतीने घडविले, की ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आध्यात्मिक गुरू म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी प्राचीन भारताच्या सर्वोच्च ध्यानतंत्राची, क्रियायोगाची विश्वाला ओळख करून दिली. “योगीकथामृत” या योगानंदजींच्या अभिजात आध्यात्मिक पुस्तकाचा प्रभाव जगभरात लाखो लोकांवर पडला आहे आणि त्याचे 50 पेक्षा अधिक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. याशिवाय त्यांनी 1917मध्ये योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (वायएसएस)ची रांची येथे स्थापना केली, आणि 1920मध्ये लॉस एंजेलिस येथे सेल्फ-रिअलाइझेशन फेलोशिप (एसआरएफ)ची स्थापना केली, ज्यांच्याद्वारे गुरूंच्या कमळाच्या चरणी बसून त्यांनी आत्मसात केलेल्या शिकवणीचा प्रसार करता येईल.
श्रीयुक्तेश्वरजी हे कडक शिस्तप्रिय होते, ते आपल्या शिष्यांना सांगत असत, “माझ्याकडे प्रशिक्षणासाठी आलेल्या शिष्यांसाठी मी कठोर असतो. हीच माझी पद्धत आहे. ती स्वीकारा किंवा सोडून द्या. मी कधीही तोडजोड करीत नाही.” परंतु त्याच वेळेस एखादी आई तिच्या मुलांची जशी प्रेमाने काळजी घेते तशी शिष्यांची काळजी घेतली जाई. योगीकथामृतमध्ये 12व्या प्रकरणामध्ये योगानंदजींनी वर्णन केले आहे, की त्यांच्या अलौकिक गुरूंच्या ससाण्यासारख्या नजरेच्या देखरेखीखाली आध्यात्मिकदृष्ट्या ते कसे विकसित झाले. त्यांच्या शिस्तीच्या प्रहाराखाली अनेक वेळा थरकाप होत असतानाही: त्यांनी माझा पोकळ गर्व हरण करण्यासाठी केलेल्या प्रहारांबद्दल मी अपार कृतज्ञ आहे. कधीकधी मला असे वाटत असे की, रूपक अर्थाने ते माझ्या जबड्यातील प्रत्येक किडका दात शोधून तो उपटून टाकत आहेत.
अगदी उच्च आध्यात्मिक स्तरावर असूनही, श्रीयुक्तेश्वरजी नेहमी साधेपणाने आणि नम्र राहिले. त्यांनी कधी खास पवित्रा दर्शविला नाही किंवा त्यांच्या अंतर्गत अलिप्ततेचे प्रदर्शन त्यांना करता आले नाही. श्रीयुक्तेश्वरजींची अनंतत्त्वाचे सखोल आकलन त्यांच्या नेहमीच्या शांतपणात आणि ज्ञानाने भारलेल्या त्यांच्या प्रत्येक शब्दात दिसून येते. योगानंदजींनी श्रद्धापूर्वक निरीक्षण केले, “मला जाणीव होती की, मी ईश्वराच्या प्रत्यक्ष प्रकटीकरणाच्या उपस्थितीत आहे. त्यांच्या दिव्यत्वाच्या भाराने माझे मस्तक आपोआपच त्यांच्यासमोर झुकले.”
श्रीयुक्तेश्वर हे धर्मग्रंथाचे अतुलनीय व्याख्याते आहेत, हे माहीत असल्याने महावतार बाबाजींनी त्यांना विनंती केली की, त्यांनी ख्रिस्ताची आणि भगवान कृष्णाची शिकवण यांच्यातील समानता शोधून दाखविणारा ग्रंथ लिहावा. जी त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे त्यांच्या प्रसिद्धी पावलेल्या “कैवल्य दर्शन (द होली सायन्स)” या 1894 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात स्पष्ट केली आहे.
योगानंदजी अनेकदा असे म्हणत की, श्रीयुक्तेश्वरजींनी जर त्यांचे मन प्रसिद्धी आणि संसारिक यशावर एकाग्र केले असते, तर ते सहजपणे एक सम्राट किंवा विश्वाचा विध्वंस करणारे राजयोद्धा झाले असते. त्याऐवजी त्यांनी क्रोध आणि अहंकाराच्या त्या अंतर्गत दुर्गांवर हल्ला चढविण्याचा पर्याय स्वीकारला होता, ज्यांच्या पतनाने मनुष्याची उन्नती होते. अधिक माहिती: yssofindia.org
लेखिका : रेणू सिंग परमार