अमर गुरू महावतार बाबाजींचे चिरंतन अभिवचन 

0
“मी माझे भौतिक शरीर कधीही सोडणार नाही. या पृथ्वीवरील काही मोजक्या लोकांना ते नेहमी दृश्यमान राहील.” अशाप्रकारे, श्री श्री परमहंस योगानंदांच्या  “योगी कथामृत” या अभिजात आध्यात्मिक पुस्तकामध्ये ‘आधुनिक भारताचे भगवत् स्वरूप योगी’ महावतार बाबाजींचे अभिवचन नमूद केले आहे. 
  या पुस्तकाच्या पवित्र लिखाणामधूनच जगाला त्या श्रेष्ठ, अजरामर अवतारी बाबाजींची प्रथम ओळख झाली. तोपर्यंत दैवी आदेशानुसार म्हणा किंवा सखोल विनयशीलतेमुळे म्हणा, उत्तर हिमालयातील बद्रीनारायण येथील दरडींमध्ये स्वत:चे भौतिक शरीर शतकानुशतके, कदाचित हजारो वर्षांपर्यंत अबाधित राखत, हे एकांतवासी गुरू प्रसिद्धीपासून पूर्णतया दूर राहिले होते.
  ह्या अजरामर गुरूंना नाशवंत काळाचा स्पर्श झालेला नाही, आणि ते पंचवीशीतल्या तरुणासारखे दिसतात. त्यांचे सुंदर स्वरूप कल्पनातीत तेजाचे वलय प्रसारित करते. हे अद्वितीय गुरू आपल्या उन्नत शिष्यांच्या समूहासह हिमालयातील एकांत प्रदेशात जागोजागी फिरतात. ह्या अनासक्त गुरूंचे गूढ शब्द “डेरा दंडा उठाओ”, म्हणजे त्या समूहाला त्या ठिकाणाहून त्वरित निघून सूक्ष्मलोकात प्रवास करण्यासाठी दिलेला संकेत असतो.
  जानेवारी 1894 मध्ये प्रयागराज येथील कुंभमेळ्यात बाबाजींनी स्वामी श्री युक्तेश्वरजींशी संपर्क साधला होता आणि क्रियायोग परंपरेचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्याकडे एक शिष्य पाठविण्याचे वचन दिले होते. ते विशेष शिष्य होते श्री श्री परमहंस योगानंदजी, ज्यांनी पुढे जाऊन योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया / सेल्फ रीअलाइझेशन फेलोशिप ची स्थापना केली. या संस्था शतकाहून अधिक काळ दिव्य सेवा करण्याच्या भावनेने प्राचीन क्रियायोग विज्ञानाच्या प्रसारामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
  त्यांच्या पश्चिमेकडील पवित्र कार्याला सुरुवात करण्याआधी, योगानंदजींना दैवी आश्वासनाची गरज भासली. जसे त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिले आहे; “माझे अंत:करण अमेरिकेस जाण्याकरिता तयार होते, पण दैवी अनुज्ञेचा दिलासा मिळविण्याचा निश्चय त्याहूनही अधिक दृढ होता.”
  25 जुलै 1920 रोजी योगानंदजींनी अगदी पहाटेपासूनच आपल्या उत्कट प्रार्थनांनी अवघा आसमंत ढवळून काढला. जेव्हा त्यांचा दैवी संपर्क कळसास पोहोचला, तेव्हा त्यांच्या कोलकाता येथील घराच्या दारावर थाप पडली. “हजार सूर्यांच्या तेजासारखे तळपणारे”  हिमालयातील ते सर्वव्यापी गुरू आपल्या तरुण शिष्यासमोर प्रकट झाले. दीपून गेलेल्या त्या तरुणाशी ते हिंदीत मधुरपणे म्हणाले, “होय, मी बाबाजी आहे. आपल्या स्वर्गीय पित्याने तुझी प्रार्थना ऐकली आहे. त्याने मला तुला सांगण्याचा आदेश दिला आहे: तुझ्या गुरूंच्या आज्ञेचे पालन कर आणि अमेरिकेस जा. भिऊ नकोस; तुझी सगळी काळजी घेतली जाईल.” हा अनुभव श्री श्री लाहिरी महाशयांच्या दृढ विश्वासाची साक्ष देतो, “जेव्हा कोणी भक्त बाबाजींचे नाव अत्यंत श्रध्देने उच्चारतो, तेव्हा त्याला ताबडतोब आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त होतो.”
  या प्रसंगाच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी जगभरातील साधक 25 जुलै हा दिवस बाबाजी स्मृती दिवस म्हणून साजरा करतात.
  अनेक वर्षानंतर, 1963 साली जेव्हा वाय एस एस/ एस आर एफ च्या तिसऱ्या अध्यक्षा श्री श्री दयामाता, द्वारहाट येथील गुहेत तीर्थयात्रेस गेल्या होत्या, तेव्हा यांच्यासमोर बाबाजी आपल्या तेजोमय स्वरूपात प्रकट झाले होते. हिमालयात द्वारहाट येथे बाबाजींनी काही काळ वास्तव्य केले होते, असे मानले जाते. हेच ते पवित्र स्थान होते, जेथे बाबाजींनी श्री श्री लाहिरी महाशयांना लुप्त झालेल्या क्रियायोग विज्ञानाची दीक्षा दिली होती. दयामाताजींनी गुरूंच्या आत्मस्वरूपाबद्दल मृदूपणे विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात बाबाजींच्या दैवी प्रेमाचे तेज ओसंडून वाहत होते. ते म्हणाले, “माझा स्वभाव प्रेम आहे, कारण केवळ प्रेमच हे जग बदलू शकते.” अधिक माहिती : yssofindia.org
लेखिका: संध्या एस. नायर

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.