योगगंगा घराघरात आल्याने जग सुंदर होईल  : प्रा. राज सिन्नरकर

0

नाशिक : प्रतिनिधी

ॠषींनी योगशास्त्राचा दिव्य परिस आपल्या हातात दिला आहे. योग हे जगणे आहे. योग म्हणजे फक्त आसन व प्राणायाम नाही. योगशास्त्र हे आपल्याला सद्गुणांचा राजा बनवते. म्हणूनच योगविषयक शिक्षण घेऊन योगगंगा घराघरात घ्यावी. यातून सात्विक माणूस हा सात्विक माणसाला जोडला जाईल. त्याने हे जग सुंदर होईल व भारतीय संस्कृती विश्वाच्या गुरूपदी जाईल, असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते व योगशास्त्राचे ज्येष्ठ्य अभ्यासक प्रा. राज सिन्नरकर यांनी केले. डाॅ. श्रीकांत वाडिलेडाॅ. वर्षा वाडिले  याप्रसंगी उपस्थित होते.

      योग विद्या धाम (शिरपूर) संस्थेतर्फे आषाढी एकादशी व गुरू पौर्णिमेनिमित्त योगप्रेमी साधक व योगशिक्षक यांच्यासाठी व्याख्यान झाले. याप्रसंगी प्रा. सिन्नरकर बोलत होते. योगगंगा घरोघरी हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.

       प्रा. सिन्नरकर म्हणाले की, योगशास्त्र हे वेद-उपनिषदांसारखेच जुने आहे. भारतीय ॠषींनी हा मजबूत पाया आपल्या संस्कृतीला दिला आहे. आत्म्याला परमात्म्याशी जोडणे म्हणजे योग आहे. आत्मा हा शरीराचा व्यवस्थापक, तर परमात्मा हा विश्वाचा व्यवस्थापक आहे. यांना जोडणे म्हणजे योग होय.

        ते म्हणाले, आजची समस्या हीच आहे की, समाज विघातक एकत्र येतात. पण, सात्विक लोक घरात कडी लावून बसले आहेत. ही शोकांतिका आहे. आजची शिक्षणपद्धती अपयशी ठरली आहे. आपण अनेक पदव्या, सुवर्णपदक घेतो. परदेशात जातो. पण, घरात कलह असतो. यात मुलांचा दोष नाही. त्यांना आपण काय दिले ? त्याला आदर, सहनशीलता, कृतज्ञता, संघर्ष शिकवला जातो का? म्हणूनच मनुष्याजवळ कृतज्ञता असली पाहीजे. हे योगशास्त्र आपल्याला कृतज्ञता शिकवते. ही कृतज्ञता आपण शिकलो, तर ती मुलांपर्यंत पोहचेल. केलेले प्रेम व उपकार यांचे सतत स्मरण केले पाहीजे. एकमेकांत आपुलकी हवी. कृतज्ञता व आपुलकी नसल्यानेच वृद्धाश्रमांची संख्या वाढली आहे.

       डाॅ. श्रीकांत वाडिले

  आपले मन पंचज्ञानेंद्रियांमध्ये विखुरले गेले आहे. योगशास्त्राने ते एकत्रित आणायचे आहे. यात मनाची सूर्यकिरणे एकत्र येतील. अशा स्थितीत सर्व गोष्टींकडे पाहण्याची समजूत बदलते. त्यामुळे मनाचे सामर्थ्य वाढते. यातूनच आत्मज्योतीचा प्रकाश निर्माण होऊन आपले जीवन आनंदी, प्रसन्न व समृद्ध होईल, असेही प्रा. सिन्नरकर यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.