नाशिक : प्रतिनिधी
भारतीय शिक्षण मंडळाने युवा आयामाच्या माध्यमातून तरुणांमध्ये शिक्षणाची आवड आणि क्षमता विकसित करण्यासाठी विकसित भारताचे दृष्टिकोन या विषयावर शोधपत्र निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ अशोका एज्युकेशन फाउंडेशनमध्ये उत्साहात झाला. प्रमुख अतिथी म्हणून भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश दाबक, सदस्य विनायक राजगुरू व हरीश काळे, अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे, अशोक बिझनेस स्कूलचे प्रभारी संचालक डॉ. महेश वाघ, अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. आशा ठोके आणि समन्वयक स्मिता बोराडे हे उपस्थित होते.
महेश दाबक यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञानप्रणालीचा असलेला समावेश समजावून सांगितला. पदवी अभ्यासक्रमाच्या वेळेसच मुलांना संशोधन करता येईल व लहान वयातच विद्यार्थी त्यांच्या आवडीप्रमाणे विषयाची निवड करेल. त्याला त्याच्या आवडीच्या विषयामध्ये त्याचे करिअर बनवता येईल, असेही त्यांनी सांगितले.
दाबक यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०चे महत्व व त्यांचे उच्च शिक्षणातील अंमलबजावणीवर मार्गदर्शन करताना सांगितले की, या धोरणामुळे विद्यार्थी लवकरात लवकर आपले शैक्षणिक ध्येय गाठु शकतात. त्यामुळे त्यांच्या वेळेचा अपव्यय टळेल आणि जीवनात लवकर प्रगती करू शकतील.
डॉ. नरेंद्र तेलरांधे म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने सांगितलेला एकात्मिक अभ्यासक्रम अशोकामध्ये मागील १४ वर्षापासून राबवला जात आहे. संस्थेचे चेअरमन अशोक कटारिया यांच्या व्हिजननुसार एकात्मिक बीए – बी.एड. व बी.एस्सी- बी.एड. हा अभ्यासक्रम राबवला जात आहे. इतकेच नाही तर एकात्मिक बी.एस्सी- बी.एडचा अभ्यासक्रम हा अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापकांनीच तयार केलेला आहे. सुरुवातीला विद्यार्थांची प्रवेश संख्या अतिशय कमी होती. तरीही विद्यार्थांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता अशोका एज्युकेशन फाउंडेशनने केली नाही.
यावेळी अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालय, संदीप युनिव्हर्सिटी, के. के. वाघ महाविद्यालय आणि मुक्त विद्यापीठ (नाशिक) या महाविद्यालयातील संशोधकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील आयशा पठाण, संजना गायकवाड, रोहन ब्राह्मणे आणि शिवानी घाडगे या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट संशोधन पेपर म्हणून सन्मानित करण्यात आले.
—