माझ्या अस्तित्वातील ‘मी’
एक रम्य सायंकाळ होती. आकाशात केशरी सूर्यकिरणांचा पदर लाजत लाजत गुंडाळत होता. पाखरांची सळसळ, वार्याचा हळुवार श्वास, आणि दूरवर वाजणाऱ्या मंदिराच्या घंटानादात माझं अंतर्मन हळूहळू जागं होत होत
मी स्वतःला आरशासमोर पाहिलं – चेहऱ्यावर अनुभवांचे हलकेसे खुणा, डोळ्यांत अनेक स्वप्नांचे प्रतिबिंब, आणि हृदयात अजूनही न उमगलेलं एक खोल अंतरंग.
‘मी’ कोण आहे?”
हा प्रश्न माझ्या श्वासांमध्ये पाझरत होता.
मी एक मुलगी होते – समाजाच्या अपेक्षांची बाहुली.
मी एक पत्नी झाले – कर्तव्याच्या वस्त्रांनी झाकलेली भावना.
मी एक आई झाले – स्वतःला विसरून कोमल प्रेमाचं दुसरं नाव.
मी एक सखी, एक बहीण, एक मुलगी… पण मी ‘मी’ कधी झाले?
एकदा वाटलं, झर्यासारखी वाहते आहे मी – पण ती वाटच झर्याच्या वाटेला लावली गेली. माझं अस्तित्व एखाद्या लिपीमध्ये हरवलेलं अक्षर, ज्याचं उच्चारलं जाणं फक्त दुसऱ्यांच्या गरजेवर अवलंबून!
पण त्या सायंकाळी, त्या शांततेत मी स्वतःशी एक नजर भिडवली.
“मी आहे!”
मी एक विचार आहे – जे मूक राहूनही गूढ सांगतो.
मी एक स्वप्न आहे – जे उघड्या डोळ्यांनीही पाहता येतं.
मी एक अस्तित्व आहे – जे इतरांच्या व्याख्येच्या पलिकडचं आहे.
मी संपूर्ण आहे – कोणाच्याही संज्ञेशिवाय, कोणाच्याही अनुमतीशिवाय.
त्या क्षणी मला उमगलं –
‘मी’ ही एक कविता आहे – स्वतःच्या शब्दांनी लिहिलेली, स्वतःच्या शांततेत गायलेली.
मी आहे – कारण मला स्वतःला जाणणं पुरेसं आहे.

– लघु निबंध लेखन
दिपाली आनंद जाधव, नाशिक